BJP split AIADMK to topple Congress government – तामिळनाडूच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली. दिवंगत एम.जी.रामचंद्रन आणि त्यानंतर जयललिता यांच्या अण्णा द्रमुक पक्षात उभी फूट पडली असून 47 पैकी 30 सदस्यांच्या गटाने विजय थलापती यांच्या टीव्हीके सरकारला जाहीर पाठिंबा दिला आहे. अण्णा द्रमुक हा भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटक पक्ष आहे. ही फोडाफोड काँग्रेसला सत्तेबाहेर काढण्यासाठी भाजपाने रचलेले कारस्थान आहे, असे म्हटले जाते आहे.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून शिवसेनेत जशी फूट पाडली तसाच प्रयोग भाजपाने तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक या मित्रपक्षाशी केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते एस. पी. वेलुमणी आणि सी. व्ही. षण्मुगम यांच्या नेतृत्वाखालील 30 आमदारांचा गट बाहेर पडला. या गटाने विजय यांच्या टीव्हीके सरकारला पाठिंबा जाहीर केला. हा पाठिंबा मिळाल्याने विजय यांना आता 5 आमदार असलेल्या काँग्रेसची आणि दोन आमदार असलेल्या डाव्या पक्षांची मुळीच गरज उरलेली नाही. त्यामुळे विजय कधीही काँग्रेस आणि डाव्यांना बाहेरचा रस्ता दाखवतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेसला बाहेर काढण्यासाठीच भाजपाने ही खेळी केली आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांचा द्रमुक आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांना धुडकावून लावत तामिळी जनतेने विजय यांच्या टीव्हीके पक्षाला भरभरून मतदान केले. त्या जोरावर टीव्हीके 108 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष बनला. मतदानाचा निकाल जाहीर होत असताना सर्वप्रथम काँग्रेसने टीव्हीकेला पाठिंबा जाहीर केला. खरेतर स्टॅलिन यांचा द्रमुक हा काँग्रेससोबत इंडिया आघाडीत होता. तरीही काँग्रेसने द्रमुकला न जुमानता टीव्हीकेला पाठिंबा दिला. टीव्हीके 108 जागा जिंकून जरी सर्वात मोठा पक्ष बनला असला तरी बहुमतासाठी 118 आमदारांची गरज होती.
त्यातच विजय हे दोन मतदारसंघातून विजयी झाले असल्याने त्यांना एका मतदारसंघातील आमदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे टीव्हीकेकडे 107 आमदारांचे बळ होते. अशा परिस्थितीत काँग्रेसचे 5, भाकपा आणि माकपाचे प्रत्येकी 2, व्हीसीके पक्षाचे 2 आणि इंडियन युनियन मुस्लीम लिगचे 2 आमदार यांच्या पाठिंब्यावर विजय थलापती यांनी कसातरी बहुमताचा आकडा गाठून सरकार स्थापन केले. भाजपाला तामिळनाडूमध्ये फारसे स्थान नाही. भाजपाचा केवळ एक उमेदवार येथे विजयी झाला आहे.साहजिकच सत्तास्थापनेमध्ये भाजपाला खास काही करता येणे शक्य नव्हते.
विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांचे लाखो चाहते स्वतःहून हजर राहिले होते. त्या दिमाखदार शपथग्रहण सोहळ्यात मंचावर विजय यांच्यासोबत राहुल गांधी होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र त्यानंतर काही मिनिटांतच तो व्हिडिओ सोशल मीडियावरून गायब करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशावरून तो व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवण्यात आला, अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली होती.
आज अण्णा द्रमुक मध्ये फूट पडताच पुन्हा भाजपाकडेच संशयाने पाहिले जात आहे.काहीही करून काँग्रेसला सत्तेतून हटवण्यासाठी भाजपानेच ही फूट घडवून आणली, अशी चर्चा सुरू झाली आहे.











