Neelam Shirke & Vijay Patkar – चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत यंदा मंत्री उदय सामंत यांना आपली पत्नी नीलम शिर्के यांचे पूर्ण पॅनल निवडून आणत पत्नीला अध्यक्ष करायचे आहे. बाल रंगभूमी परिषदेचे अध्यक्षपद नीलम शिर्के यांना दिल्यानंतर आता रंगभूमी क्षेत्रात उदय सामंत यांची घुसखोरी सुरू झाली आहे. विजय पाटकर यांनी पोस्ट करीत गंभीर आरोप केले की, उदय सामंत यांचा विशेष कार्यकारी अधिकारी (ओएसडी) हा येथे ठाण मांडून बसला आहे. ओएसडीने मला उमेदवारी अर्ज भरू दिला नाही.
या प्रकरणात आता उबाठा उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेत मंत्री उदय सामंत यांच्या पत्नीला निवडून आणण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला आहे. अभिनेते विजय पाटकर पोस्ट करत म्हणाले की, मी उमेदवारी अर्ज भरून कोल्हापुरला पाठवला होता. मात्र काही लोकांनी राजकारण करून तो अर्ज प्रक्रियेतून पुढे जाऊ दिला नाही. एका मंत्र्यांचा ओएसडी गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुरात ठाण मांडून बसला असून, कोण उमेदवार असावा किंवा नसावा यासाठी दबाव टाकला जात आहे. आम्ही गेली 40 वर्षे या इंडस्ट्रीत काम करतो, आम्ही कधी राजकारण्यांकडे जात नाही. मग त्यांनी आमच्या क्षेत्रात हस्तक्षेप का करावा?
पुढे विद्यमान अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यावर आरोप करताना पाटकर म्हणाले की, माझा आक्षेप मेघराज राजेभोसलेवर आहे. त्याला लाज वाटायला पाहिजे. मागील 10 वर्षे काय केले? महामंडळाचं अक्षरशः थडगे केले. याने 7 महिने कर्मचाऱ्यांचा पगारदेखील दिला नाही. उलट मला फोन करतो आणि म्हणतो, माझ्या पॅनलमधून उभे राहा. याला लाज कशी वाटत नाही? मी काय माती खाल्ली आहे याच्या पॅनलमधून उभे राहायला?
मी माझा फॉर्म भरून पाठवला, पण दुपारी वेळ संपली तेव्हा मला कळले की, माझा फॉर्म भरला नाही. मी त्यांना विचारले तर ते म्हणाले की, आम्हाला सांगण्यात आले की, थोडे थांबा, दुसऱ्याचे पॅनल उभे राहू द्यायचे नाही, असे राजकारण सुरू आहे. बाहेरचे राजकारण बघवत नाही, ऐकवतही नाही. तेच राजकारण चित्रपट महामंडळात आले आहे. अभिनेते विजय पाटकरांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देताना मेघराज राजेभोसले यांनी म्हटले की, विजय पाटकर हा इंडस्ट्रीतला कलंक, अभिनयामध्ये कच्चा आहे, पण लबाडीमध्ये एक नंबर आहे. चार दिवसांत 60 जणांनी फॉर्म भरला आहे. 40 विरोधी पक्षातील लोकांनी अर्ज भरला. कुठला मंत्री आणि कुठला ओएसडी होता, ज्याने तुला फॉर्म भरू दिला नाही? त्याचे नाव जाहीर करावे.
या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये नीलम उदय सामंत यांची निवड व्हावी यासाठी संपूर्ण सरकारी यंत्रणा कामाला लागली. विजय पाटकर यांच्यासारख्या अत्यंत ज्येष्ठ अभिनेत्यालासुद्धा अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती मिळत आहे, जे अतिशय गंभीर आहे. नेते अभिनेत्यांसारखे वावरतात तिथपर्यंत ठीक आहे. पण नेते अभिनेत्यांचे हक्काचे कलाक्षेत्रही बळकावत असतील, तर दुर्दैवी आहे.
याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्यावर नीलम शिर्के यांनी एक पत्रक काढून आपण उद्या निवडणुकीतून माघार घेणार असल्याचे सांगितले. या पत्रकात त्यांनी म्हटले की, चित्रपट महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि अभिनेते आनंद काळे या दोघांनीही मी या निवडणुकीत उभे राहण्याबद्दल आग्रही विनंती केली. त्यांचा मान राखून सदर निवडणुकीत सहभागी होण्याचे मी ठरवले होते. त्या अनुषंगाने मी स्वतः अभिनेत्री प्रवर्गातून उमेदवारी अर्जदेखील दाखल केला. चित्रपट महामंडळाच्या विद्यमान कार्यकारी मंडळाच्या सदस्य असलेल्या वर्षाताई उसगावकर यावर्षीच्या निवडणूक सहभागी होण्यासाठी इच्छुक नसल्याचे मला मेघराज राजे भोसले यांनीच कळविले होते.
मात्र, त्यांनी अभिनेत्री प्रवर्गातून अर्ज दाखल केल्याचे मला माझा उमेदवारी अर्ज भरून झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता कळले. मुळात वर्षाताईंसारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीच्या विरोधात निवडणूक लढवून चित्रपट महामंडळाचा राजकीय आखाडा करण्याचा माझा कोणताही हेतू नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्यापासून सुरू होत आहे. असे असतानाही प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांमधून काही मंडळींनी आरोप-प्रत्यारोप आणि चिखलफेक करावत्ता सुरुवात केली आहे, ही बाब मनाला खेद देणारी आणि अत्यंत वेदनादायक आहे. आज सकाळी माझी अध्यक्ष मेघराजराजे भोसले आणि वर्षाताई उसगावकर यांच्यासह काही ज्येष्ठ नाट्यकर्मींशी माझी सविस्तर चर्चा झाली. वर्षाताईंसह सर्व ज्येष्ठ सहकार्यांचा मान राखून मी निवडणुकीत त्यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक प्रक्रियेचा भाग म्हणून मी उद्या अर्ज मागे घेणार आहे.











