NEET Question Papers Sent by Air Force Plane; Telegram Blocked – राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट-यूजी) 2026 ची रविवारी 21 जून रोजी फेरपरीक्षा आहे. या परीक्षेत पेपरफुटी होऊ नये म्हणून केंद्र सरकारने अजब निर्णय घेतले आहेत. अकोला व अमरावती येथे नीटच्या प्रश्नपत्रिका हवाईदलाच्या विमानाने पाठवण्यात आल्या. इतकेच नव्हे तर टेलिग्राम प्लॅटफॉर्मवर 22 जूनपर्यंत पूर्ण बंदी आणली आहे. टेलिग्रामवरील मेसेज एडिटिंग सुविधा 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या या कृतीवर जोरदार टीका होत आहे. आधीच्या नीट परीक्षेचे जे पेपर फुटले ते केंद्रावर नेताना फुटले नाहीत. हे पेपर तयार करण्याची जबाबदारी असलेल्या एनटीए मधील अधिकार्यांनीच हे पेपर फोडले असे उघड झाले आहे. त्यामुळे एनटीएवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, पेपर तिथून फोडले जात आहेत. मात्र तसे न करता हवाईदलाला पेपर पोहोचवण्याचे काम दिले जाते हे योग्य आहे का, असा सवाल विचारला जात आहे. इतकेच नव्हे तर टेलिग्रामवर बंदी कशासाठी आणली? फुटलेला पेपर व्हॉटसअॅप किंवा इतर माध्यमातूनही व्हायरल करता येतो. नीट, सीबीएसई अशा प्रत्येक परीक्षेवेळी असेच हास्यास्पद बाह्य उपाय करणार की आतील भ्रष्टाचार नष्ट करण्याचा प्रयत्न करणार हा सवाल आहे. यावेळी पेपर फुटला नाही तरी दरवेळी फुटणार नाही याची खात्री देता येईल असे कायमस्वरूपी उपाय करायला हवे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
राष्ट्रीय परीक्षा संस्थाच्या (एनटीए) मते, नीट पुनर्परीक्षेच्या नावाखाली टेलिग्रामवरील अनेक चॅनेल आणि गट विद्यार्थी व पालकांची फसवणूक करत होते. कथित प्रश्नपत्रिका उपलब्ध असल्याचे सांगत हजारो ते लाखो रुपयांची मागणी केली जात होती. परीक्षा सुरक्षित, पारदर्शक आणि निष्पक्ष वातावरणात पार पडावी यासाठीच बंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेने स्पष्ट केले आहे. या निर्णयावर अनेक स्तरांतून प्रश्न उपस्थित होत आहेत. व्हॉट्सअॅप, रेडिट, डिस्कॉर्ड, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच व्हीपीएनसारख्या माध्यमांद्वारे पेपरफुटी पुन्हा होऊ शकते. मग केवळ टेलिग्रामवर निर्बंध लावल्याने पेपरफुटी थांबेल का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, नीटची तयारी करणारे हजारो विद्यार्थी शेवटच्या टप्प्यात स्टडी ग्रुप्स, नोट आणि शंका निरसनासाठी टेलिग्रामचा वापर करतात. त्यामुळे या निर्बंधांचा फटका प्रामाणिक विद्यार्थ्यांनाही बसत असल्याची टीका होत आहे. टेलिग्राम बंद केल्याने पेपरफुटीची मूळ कारणे संपणार आहेत का? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित होत आहे.
देशभरात नीट-युजी परीक्षा 3 मे रोजी घेण्यात आली होती. 7 मे रोजी पेपर फुटल्याचे उघडकीस आले होते. महाराष्ट्रातील पुण्यातून प्रश्नपत्रिका फुटून ती डिजिटल माध्यमातून थेट राजस्थानमधील मुख्य हस्तकांपर्यंत पोहोचवण्यात आली. अॅप्स, प्रामुख्याने टेलिग्रामचा वापर करून प्रश्नपत्रिका उमेदवारांपर्यंत पोहोचवली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर 12 मे रोजी परीक्षा रद्द करण्यात आली आणि आता 21 जून रोजी पुनर्परीक्षा घेतली जाणार आहे. या फेरपरीक्षेला देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थी बसणार आहेत. उत्तर प्रदेश, बिहार आणि महाराष्ट्रात सर्वाधिक परीक्षा केंद्र आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर यांसारख्या प्रमुख शहरांत एकूण 35 परीक्षा केंद्र आहेत. या परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी पहिल्यांदा वायुदलाची मदत घेण्यात आली आहे. अमरावती येथे वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरमधून सुमारे 6 हजार प्रश्नपत्रिका दाखल झाल्या. त्यानंतर कडेकोट पोलीस बंदोबस्तात त्या जिल्हा कोषागाराच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आल्या. अकोल्यातही वायुदलाच्या विशेष विमानातून प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात आल्या. केंद्रीय सुरक्षा दल, भारतीय टपाल विभाग, जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया
पार पडली.
सीआयएसएफ, पोलीस, महसूल विभाग आणि इतर सुरक्षा यंत्रणा तैनात करून प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. नीट प्रश्नपत्रिका तयार करणार्यांना 21 जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये ठेवले जाणार आहे. पण प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक किंवा अंतर्गत यंत्रणांमधून होणार्या संभाव्य पेपरफुटीवर या उपाययोजनांचा किती परिणाम होईल? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर उबाठा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या की, पंतप्रधान कार्यालय, भारतीय हवाई दल, सीआरपीएफ, सीआयएसएफ, सीसीटीव्ही, जीपीएस ट्रॅकिंग, बहुस्तरीय तपासणी आणि टेलिग्रामवरील बंदी अशा सर्व यंत्रणा एका फेरपरीक्षेसाठी वापराव्या लागत आहेत. यावरून पेपर लीक माफियाने संपूर्ण व्यवस्थेलाच गुडघ्यावर आणले आहे.
फेरपरीक्षेच्या एक दिवस विद्यार्थ्यांना
दिल्लीत येण्याचे दीपकेचे आवाहन
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी जयपूर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या हल्ल्यानंतरही आपली भूमिका कायम ठेवत आज नागपुरात आंदोलन केले. यावेळी त्यांनी 20 जून रोजी दिल्ली येथे देशभरातील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करावी, असे आवाहन केले. 21 जून रोजी नीट (यूजी) फेरपरीक्षा होणार असताना त्याआधी एक दिवस 20 जूनला दिल्लीत आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
याबाबत दीपके यांनी सांगितले की, परीक्षांमधील कथित घोटाळे, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि जबाबदारीच्या अभावामुळे देशाचे मोठे नुकसान होत आहे. शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर देशातील विविध शहरांमध्ये शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन सुरूच राहील. पुण्यानंतर लखनऊ, जयपूर, बंगळुरू आणि नागपूरमध्येही आंदोलन करण्यात येत आहे. त्यानंतर 20 जून रोजी दिल्लीत देशभरातील विद्यार्थी एकत्र येऊन शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतील. राजीनामा मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही. माझ्यावर झालेला हल्ला हा वाढत्या बेरोजगारीचेही प्रतीक आहे. काही तरुणांना थोडे पैसे देऊन अशा प्रकारच्या कृत्यांसाठी वापरले जाते. त्यांच्याकडे रोजगार असता तर त्यांनी असे प्रकार केले नसते. काँग्रेसने चुकीचे केले म्हणूनच भाजपाला लोकांनी सत्तेत बसवले. परंतु, त्यांच्याकडूनही निराशाच झाली.









