Home / News / Student Protest Gains Momentum; Leaders Rush to Claim Credit : विद्यार्थी आंदोलनाची तुफान ताकद पाहून नेते श्रेयासाठी धावले! भेटण्यासाठी रीघ लावली

Student Protest Gains Momentum; Leaders Rush to Claim Credit : विद्यार्थी आंदोलनाची तुफान ताकद पाहून नेते श्रेयासाठी धावले! भेटण्यासाठी रीघ लावली

Student Protest Gains Momentum; Leaders Rush to Claim Credit – अभिजित दीपके यांची कॉकरोच पार्टी आणि सोनम वांगचुक यांचा पाठिंबा...

By: Team Navakal
Student Protest Gains Momentum; Leaders Rush to Claim Credit
Social + WhatsApp CTA

Student Protest Gains Momentum; Leaders Rush to Claim Credit – अभिजित दीपके यांची कॉकरोच पार्टी आणि सोनम वांगचुक यांचा पाठिंबा यावर काल राजधानी दिल्लीत विद्यार्थ्यांनी तुफान आंदोलन केले. विद्यार्थ्यांची संख्या, त्यांचा नेत्यांवरचा संताप पाहून आज विरोधी पक्षातील नेते श्रेय घेण्यासाठी जंतरमंतरवर धावले. काल मुले लाठ्या खात होती. अश्रुधुरात गुदमरत होती तेव्हा गायब असलेला विरोधी पक्ष कळवळा आल्याचा आव आणत हॉस्पिटल, पोलीस स्टेशन, मैदानावर पोहोचला. या सर्व घडामोडींनी आज दुसऱ्या दिवशीही आंदोलनाची ताकद वाढली.


काल जवळच असलेल्या संसद भवनात असूनही उबाठा खासदार जंतरमंतरवर पोहोचले नाहीत. मात्र आज खासदार संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत यांनी जंतरमंतरवर जात अभिजित दीपकेची भेट घेतली. संजय राऊत तर दीपके आपला खास मित्र
असल्याप्रमाणे त्याच्या खांद्यावर हात टाकून उभे होते. काल हे नेते का आले नाहीत या प्रश्नाला बगल देत संजय राऊत म्हणाले की, आम्ही
महाराष्ट्रात आंदोलने केली, आता हे आंदोलन देशव्यापी करायला हवे आहे. काल आम्ही वांगचुकना भेटायला गेलो होतो. (राऊत यांनी हे सांगितले नाही की ते वांगचुक यांना भेटायला गेले तेव्हा वांगचुकना वैद्यकीय तपासणीला नेल्याने त्यांची भेटच झाली नव्हती) उबाठा नेते येऊन गेल्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल हे जंतरमंतरवर उपस्थित झाले.

आपने पोलिसांच्या ताब्यात असलेल्या विद्यार्थ्यांची सोडवणूक करण्यासाठी पुढाकार घेतला.कालपर्यंत आजारी आहेत असे ज्यांच्याबद्दल सांगितले जात होते त्या सुप्रिया सुळे आज मात्र शरद पवारांसोबत जंतरमंतरवर आल्या. शरद पवार मैदानातील आंदोलन स्थळापर्यंत जाऊ न शकल्याने दीपके त्यांच्या गाडीजवळ आला आणि तिथेच पवारांनी जखमी विद्यार्थ्यांची चौकशी केली.

यावेळी शरद पवारांनी सवाल केला की, तुम्ही किती दिवस इथे बसणार आहात, त्यावर दीपके म्हणाला की जितके दिवस लागतील तितके दिवस बसण्याची तयारी आहे. राज ठाकरेंनी मात्र नवे पत्र लिहिण्यावरच भर दिला. उद्धव ठाकरे उद्या जंतरमंतरवर जाणार आहेत. आदित्य ठाकरेंनी प्रेस घेऊन विद्यार्थ्यांसाठी मोफत कायदा सल्ला सेवा सुरू केल्याचे जाहीर केले. प्रकाश आंबेडकर यांनी 23 जुलैला राज्यव्यापी बंदची हाक दिली. रात्री 10 वाजताच्या सुमारास उबाठा प्रमुख उद्धव ठाकरेही जंतरमंतर येथे पोहचले. त्यांनी दिपकेसह आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तुम्ही देशाचे भविष्य आहात त्यामुळे केवळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही तर व्यवस्था बदलण्याचे आवाहन करत लाठीमाराचा निषेध केला.


आज काँग्रेस पक्षानेही अचानक उचल खाल्ली. राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी प्रथम आरएमएल रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यानंतर आपल्या शंभर खासदारांना घेऊन त्यांनी पंतप्रधान निवासाबाहेर ठिय्या दिला. पंतप्रधान व गृहमंत्री संसदेत येत नाही, मग आम्ही काय करू, असा सवाल करीत त्यांनी पंतप्रधानांचा राजीनामा मागत घोषणाबाजी केली.
रात्री 10 वाजता दीपके व आंदोलक जंतरमंतरवर परतले. तोपर्यंत पोलिसांनी त्यांचे व्यासपीठ तोडून टाकले. तरीही आज आंदोलन सुरू राहिले. काही जखमी विद्यार्थी मल्लमपट्टी करून आले होते. सकाळी 10 वाजता कॉकरोच पार्टीचा संस्थापक अभिजित दीपकेने पत्रकार परिषद घेऊन म्हटले की, काल अत्यंत क्रूरपणे दिल्ली पोलिसांनी हल्ला केला. वरिष्ठ पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले.


धर्मेंद्र प्रधान अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्येस जबाबदार आहेत. त्यांच्या पाठिंब्यासाठी आणखी विद्यार्थ्यांचा जीव घेणार का? एका मुलीच्या गळ्यावर पोलिसांनी लाठी मारली, ती खाली पडली, मग चेंगराचेंगरी झाली. ती आता रुग्णालयात गंभीर स्थितीत आहे. 750 हून अधिक जखमी आहेत. ही तानाशाही आहे. दगड भरलेले ट्रक कुठून आले? नावाची पट्टी हटवून पोलिसांनी मारहाण केली. वांगचुक काल उपोषण सोडणार होते, त्यांचा उपोषणाचा 23 वा दिवस होता, पण पोलिसांचे क्रौर्य पाहून त्यांनी विचार बदलला. आता त्यांचे मसल मास गेले आहे. त्यांच्या अवयवांवर दुष्परिणाम होत आहे.


सरकारने आम्हाला चर्चेला बोलावले, पण आमचे मोबाईल जप्त केले. जे. पी. नड्डा यांच्या घरी पाच तास बसवले.आम्हाला ताब्यातच घेतले होते. चर्चेला बोलावल्याचे दाखवायचे हा त्यांचा हेतू आहे. आम्ही आता इथेच हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत. यानंतर मोर्चा काढणार नाही. कारण आमची मुले जखमी होतील. वांगचुक यांचे उपोषण सुरू राहील. आम्ही सरकारकडे चर्चा करायला जाणार नाही, त्यांनी इथे यावे. माझे पाकिस्तानशी संबंध आहेत म्हणतात, तर त्याची चौकशी करून पुरावे द्या. मुलांना मारहाण
का करता?


आज धर्मेंद्र प्रधान यांच्या घराबाहेर बंदोबस्त ठेवण्यात आला होता, संसदेबाहेरील बंदोबस्तही वाढवण्यात आला. दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवरच आज तोडफोड केल्याप्रकरणी कॅनॉट प्लेस, पार्लमेंट स्ट्रीट अशा पाच पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल केला. हा गुन्हा दाखल होत असतानाच काल पोलीस लाठीमारात जखमी झालेले तरुण जंतरमंतर या आंदोलनस्थळी जमले होते. त्याचवेळी पत्रकार परिषद घेत आपचे अध्यक्ष केजरीवाल यांनी म्हटले की, विद्यार्थ्यांना देशद्रोही म्हणणे योग्य नाही. विरोधी पक्षनेत्यांनी आज नीट प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.


दिल्लीत संसदेबाहेर बोलताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, काल लाठीमार का झाला? विद्यार्थ्यांचे कपडे का फाडले? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यायला हवे, पण मोदी काही बोलत नाहीत. काल तर आम्हाला संसद भवनात अडकून ठेवले होते, आम्हाला बाहेर येऊ दिले नाही. लोकसभा, राज्यसभा सतत स्थगित झाल्यावर राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान शांत का आहेत? विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा निंदनीय प्रकार थांबवला पाहिजे. हे विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी लढत आहेत. पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे, धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा दिला पाहिजे, त्याचबरोबर लाठीहल्ला करणारे गृहमंत्री आणि पंतप्रधानांनीही राजीनामा
दिला पाहिजे.


आज आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा हे आरएमएल रुग्णालयात गेले आणि त्यांनी जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालय प्रशासनाशी चर्चा केली. एकूण 90 विद्यार्थी जखमी झाल्याचा अधिकृत आकडा आहे. जे. पी. नड्डा यांच्यानंतर राहुल व प्रियांका यांनीही रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. त्यानंतर 100 खासदारांना सोबत घेऊन राहुल व प्रियांका गांधी यांनी लोककल्याण मार्गावरील पंतप्रधानांच्या निवासाजवळ ठिय्या आंदोलन सुरू केले. के. सी. वेणुगोपाल, नासीर हुसैन, मल्लिकार्जुन खरगे हे सर्व नेते उपस्थित होते. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करणाऱ्या घोषणा जोशात दिल्या जात होत्या. या सर्व घडामोडींमुळे दीपकेंच्या आंदोलनाला बळ मिळाले.


राहुल, प्रियंकांना एफआयआर दाखल करून सोडले


काँग्रेसचे राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर सुमारे साडेतीन तास ठिय्या दिला. त्यानंतर केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी तिथे येऊन राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भूमिका स्पष्ट करावी, आंदोलकांवरील लाठीमाराची चौकशी व्हावी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत सविस्तर चर्चा व्हावी, चर्चेदरम्यान केंद्रीय गृहसचिवांनी उपस्थित राहावे, अशा 5 मागण्या केल्या. त्यानंतर सरकारने राहुल गांधी यांची संसदेत चर्चा करण्याची मागणी मंजूर केली.

परंतु राहुल गांधी यांनी शब्द फिरवला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची नवी अट त्यांनी घातली, असा दावा जितेंद्र सिंह यांनी केला. सरकारने आंदोलन दुसऱ्या ठिकाणी हलवण्याची विनंती त्यांना केली. मात्र राहुल गांधींनी ती फेटाळत तिथेच बसून आंदोलन करत राहिले. त्यानंतर दिल्ली पोलीस राहुल गांधी यांना पकडण्यासाठी तिथे पोहोचले. यावेळी राहुल गांधी आणि पोलिसांत मोठी झटापट झाली. राहुल गांधी यांनी अक्षरशः जमिनीवर लोळण घेत पोलिसांना प्रतिकार केला.

मात्र, काही क्षणात पोलिसांनी राहुल आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेऊन खेचतच बसमध्ये बसवले. अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले. त्यानंतर राहुल आणि अखिलेश यांना छत्रसाल स्टेडियम येथे नेण्यात आले, तर प्रियंका यांना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री नऊ वाजता सोनिया गांधी राहुल गांधी यांना भेटायला पोहोचल्या. त्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र काही वेळाने त्यांना सोडण्यात आले.


नीट पेपरफुटीची कारवाई केली
पंतप्रधान मोदींचे स्पष्टीकरण


‌’नवी दिल्ली- आज सकाळी भाजपा व मित्रपक्षाच्या खासदारांची विशेष मंगल मिलन बैठक पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत झाली. यावेळी नीट पेपरफुटीबाबत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या प्रकरणी 13 जणांना अटक केली असून, पुन्हा पेपरफुटी होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारी घेतली आहे. विद्यार्थ्यांना योग्य मार्गाने नेले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिपादनाची माहिती देताना संसदीय कामकाज मंत्री किरण रिजूजू म्हणाले की, नीट पेपरफुटी प्रकरणी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, 13 जणांना अटक करण्याची कारवाई त्वरित करण्यात आली.

त्यानंतर नीटची पुनर्परीक्षा घेतली. ती व्यवस्थित पार पडली. त्याचे निकालही लागले. पुन्हा पेपर फुटू नये यासाठी नियोजन केले आहे. पेपर फुटणे हा राजकीय विषय नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्याला प्राधान्य द्यायला हवे. पेपरफुटीला जे जबाबदार आहेत, त्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी विशेष वकील नियुक्त केले जाणार आहेत.


विशेष म्हणजे, या बैठकीवेळी पंतप्रधानांच्या उजव्या हाताला राजनाथसिंह हे बसले होते, ज्यांना मिंमंडळातून काढले जाण्याची चर्चा आहे आणि डाव्या बाजूला शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान विराजमान होते.

विद्यार्थ्यांना मारहाण!
कोर्टाला ओढू नका!


कॉक्रोच जनता पार्टीच्या संसदेवरील धडक मोर्चावर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीहल्ल्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आज दिल्लीचे वकील नरेंद्र मिश्रा यांनी जनहित याचिका दाखल केली. मात्र ‌’आम्हाला या प्रकरणात ओढू नका‌’ असे म्हणत न्यायालयाने तातडीच्या सुनावणीला नकार देत उद्या सुनावणी ठेवली. मुख्य न्या. देवेंद्र कुमार आणि न्या. तेआस कारिया यांच्या खंडपीठाने हा निर्णय घेतला.

Web Title:
संबंधित बातम्या