Vinayak Raut’s Daughter-in-Law Levels Serious Charges Against Husband & Family – उबाठाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांचा मुलगा गितेश याच्यावर सून गिरीजाने आज पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक आरोप केले . तिने पोलिसात तक्रारही दाखल केली असून २३ जुलैला या प्रकरणी कोर्टात सुनावणी आहे .सून गिरीजा राऊत यांनी कौटुंबिक छळ, फसवणूक, मारहाण, जादूटोणा आणि अघोरी कृत्यांचे गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर विनायक राऊत यांचा पुत्र गितेश यावरही गंभीर आरोप केले.
सूनेच्या तक्रारीवरून कापूरबावडी पोलिसांनी राऊत कुटुंबासह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये नगरसेवक गितेश राऊत (पती), शामल राऊत (सासू),आबा राऊत,सुरेखा सरफरे,राजेश सरफरे,तांत्रिक -फिरोज बाबा,काझी बाबा आणि हरीशचंद्र घाडी यांचा समवेश आहे. पोलिसांनी तांत्रिक फिरोज खान याला अटक केली. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, विनायक राऊत यांनी सर्व आरोप फेटाळून लावत सूनेने १२ कोटी रुपये मागितले असा आरोप केला.
गिरीजाने तक्रारीत नमूद केले की, माझे पती, गितेश राऊत हे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास असक्षम आहेत. सासरे विनायक राऊत, सासू शामल राऊत यांना हे माहीत असूनही त्यांनी गितेशचे माझ्यासोबत लग्न लावून दिले. सासूने मला घरातील जेवण, देवपूजा व इतर बाबींवरून मानसिक त्रास देऊन, मासिक पाळी पुढे करण्यासाठी सातत्याने गोळ्या घेण्यासाठी भरीस पाडले. यामुळे माझी तब्बेत बिघडली.
वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करत असताना ते इलाज नाकारून मला ‘होम इन्सेमिनेशन’ हा पर्याय करण्यावर दबाव टाकून मला त्रास दिला. माझा शारीरिक, मानसिक, भावनात्मक छळ केला. २०१७ साली लग्न झाल्यापासून २०१८ पर्यंत त्यांनी माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीत. आजपर्यंत आम्ही ऊटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, नॉर्वे, दुबई, केनिया, थायलंड अशा देशांत फिरायला गेलो. तिथेही पतीने माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत. त्याबाबत विचारणा केल्यास मला सातत्याने शिवीगाळ करून मारहाण केली.
गिरीजा राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सुरुवातीपासून विनायक राऊत आणि त्यांच्या मुलाने माझ्याशी खोटे बोलून आमचा घात केला आहे. विवाह ठरवताना मुंबईत बंगला असल्याची खोटी माहिती दिली. डिसेंबर २०१७ ला माझे आणि गितेशचे लग्न झाले.सप्टेंबर २०१८ पर्यंत आमच्यात कुठलेही शारिरीक संबंध झाले नाही. त्यासाठी आमच्या कुटुंबीयांनी बसून बोलणी केली. त्यानंतर असे ठरले होते की गणपती झाल्यानंतर याबाबत विचार करु. पण गणपतीवरून आल्यावर त्यांनी माझ्यावर अघोरी उपाय सुरु केले.
सिंधुदुर्ग येथील काजीबाबा आणि फिरोज बाबा यांच्या माध्यमातून जादूटोणा व अघोरी कृत्ये केली. सप्टेंबर २०१८ ते २०२२ पर्यंत त्यांनी ते सुरु ठेवले. या काळात अघोरी कृत्य, हायपोथायॉराईड असून अँटी डिप्रेशन औषधे घ्यायला लावली. अघोरी कृत्य म्हणजे मला वेगवेगळ्या बाबांकडे घेऊन जायचे. ते बाबा त्यांच्या परीने उपाय करायचे. कोणी जिवंत कोंबडा अंगावरुन उतरवत, कोणी कणकेच्या बाहुल्या, मांसाचे तुकडे माझ्या अंगावरुन उतरवत होता. माझ्या अंगावरचे न धुतलेले कपडे घेऊन, केस ओढून उतारे करत होते.
देवीसमोरचा अंगारा पेलाभरुन प्यायला द्यायचे. त्यांनी जे सांगितले ते उपाय आम्ही केले. विनायक राऊत यांचा मुलगा गितेश शारिरीक संबंध करण्यासाठी असमर्थ आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सर्व करुन माझे आयुष्य बरबाद केले. राजकीय दबावापेक्षा सासरच्या लोकांकडून माझ्यावर प्रचंड दबाव आणला जात होता. गितेशने मला मारहाण करुन हे सांगितले की माझ्या वडिलांनी दोन कोटी रुपये निवडणुकीसाठी लावले आहेत. तुझ्यामुळे त्यांची प्रतिमा वाईट झाली तर तुझे काय करेन याद राख. माझे आयुष्य नॉर्मल कधीच नव्हते. मागच्या सात वर्षांत मला त्याने खूप छळले आहे.
विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीसह दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ज्या घरात राहतो ते झोपडपट्टीत आहे. लग्नाच्या बोलण्यांपासून आम्हाला कधीही सांगितले नव्हते की दुसरे घर झोपडपट्टीत आहे. विनायक राऊत हे नेहमी नवरात्रीत घट बसण्याच्या दिवशी आणि उठण्याच्या दिवशीच घरी यायचे. इतर दिवशी कधीही ते आले नाही. कुटुंबप्रमुख म्हणून त्यांनी जी जबाबदारी घ्यायची होती ती त्यांनी कधीही केली नाही. राऊत कुटुंबाला राजकीय पाठबळ होते त्यामुळे मी आधी तक्रार केली नाही. आज ना उद्या परिस्थिती बदलून जाईल अशी आशा होती. पण तसे झाले नाही. मला चांगला संसार करायचा होता. विनायक राऊत यांच्यावर मनी लाॅंड्रिंगचा आरोप करीत गिरीजा म्हणाली की, ते काळा पैसा पांढरा करायचे , पण मी त्यात लक्ष घातले नाही . एकदा त्यांनी १७ लाखांची रोकड आणली आणि रात्रभर जागून मला ती मोजायला लावली .
विनायक राऊत यांनी यावर उत्तर देताना सांगितले की, माझ्यावर आणि कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाही. तिने आधी तक्रार का केली नाही ? अघोरी प्रकार आम्ही कधीच केले नाही . गिरीजाने सांगितले की, अघोरी प्रकारावेळी प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. तेव्हाच कोणी आक्षेप का नाही घेतला? तिच्या म्हणण्यानुसार २०१८ मध्ये घटना झाल्या, मग २०२६ मध्ये त्याची तक्रार का करत आहेत?
यामध्ये काही काळेबेरे आहे. आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातील नाही. सध्या त्या दोघांची घटस्फोट केस सुरू आहे. आमच्या वकिलांची दोनदा बोलणी झाली. त्यावेळी तिने १२ कोटी मागितले . मानसिक नुकसान भरपाई ५ कोटी द्यावी, तीन बीएचके घर आणि ऑटोमॅटीक गाडी , दरमहा २ लाख रूपये अशी एकूण १२ कोटी रुपयांची तिने मागणी केली. या मागण्या पूर्ण होत नाही म्हणून आता तिने तक्रार केली. मात्र गिरीजा यांनी १२ कोटी रुपये मागितल्याचा दावा फेटाळला आहे.
असे गुन्हे ठाण्यातच दाखल होऊ शकतात
विनायक राऊत यांच्या सुनेने कुटुंबावर आरोप केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. याबाबत उबाठा खा. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, हा विनायक राऊत यांचा कौटुंबिक विषय आहे. त्यांच्या कुटुंबातील मला माहीत नाही. त्यावर तेच बोलतील. परंतु ठाण्यात गुन्हा दाखल झाला हे संशयास्पद आहे. त्याचे कारण असे गुन्हे ठाण्यातच दाखल होऊ शकतात. मला यावर अधिक काही बोलायचे नाही. तर ठाण्यात गुन्हा नोंदवण्याबाबत गिरीजा राऊत यांचे वकील अॅड. सागर कदम यांनी सांगितले की, गिरीजा तिच्या आईवडिलांसोबत लहानपणापासून ठाण्यातच राहते . त्यामुळे त्यांना ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा अधिकार आहे .











