Home / राजकीय / Uddhav Thackeray : ठाकरेंनी नाशिकच्या १५ नगरसेवकांना ‘मातोश्री’वर बोलावले; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर हालचाली वेगात

Uddhav Thackeray : ठाकरेंनी नाशिकच्या १५ नगरसेवकांना ‘मातोश्री’वर बोलावले; ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर हालचाली वेगात

Uddhav Thackeray : नाशिक महापालिकेतील कथित फुटीच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असताना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट हस्तक्षेप...

By: Team Navakal
Uddhav Thackeray 
Social + WhatsApp CTA

Uddhav Thackeray : नाशिक महापालिकेतील कथित फुटीच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवली असताना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट हस्तक्षेप करत नाशिकमधील सर्व १५ नगरसेवकांना ‘मातोश्री’वर बैठकीसाठी बोलावले आहे. उद्या दुपारी १२ वाजता होणाऱ्या या बैठकीत पक्षस्थितीचा आढावा घेत नगरसेवकांची एकनिष्ठता तपासली जाणार आहे.

नाशिकमध्ये ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले असून, उबाठाचे १० ते १२ नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, स्थानिक नेत्यांनी या चर्चांना अफवा ठरवत सर्व नगरसेवक पक्षाशी ठाम असल्याचा दावा केला आहे. तरीही या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी तातडीने बैठक बोलावल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

दरम्यान, संभाव्य फुट रोखण्यासाठी पक्षाने ‘डॅमेज कंट्रोल’ सुरू केले आहे. उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी नुकतीच नाशिकमध्ये बंद दाराआड बैठक घेत नगरसेवकांची भूमिका जाणून घेतली. त्यावेळी सर्वांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा शब्द दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वतीने नगरसेवकांचे अभिनंदनही करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यापूर्वी गटनेते केशव पोरजे यांनी पत्रकार परिषद घेऊन फुटीच्या चर्चांचा ठाम इन्कार केला होता. त्यांनी १५ पैकी १३ नगरसेवकांना माध्यमांसमोर हजर करत सर्वजण पक्षासोबत असल्याचे स्पष्ट केले. तसेच काही मध्यस्थांकडून नगरसेवकांना पक्षांतरासाठी आमिषे दाखवली जात असल्याचा आरोप करत, १० नगरसेवक आणल्यास उपमहापौरपद आणि विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन दिले जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला.

महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांनीही इशारा देत, पक्ष सोडायचा असल्यास आधी नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा, अन्यथा पक्षत्याग करणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल, असे स्पष्ट केले.

दरम्यान, उबाठा गटाने बंडखोर खासदारांविरोधातही आक्रमक भूमिका घेतली असून खासदार अरविंद सावंत यांनी सहा बंडखोर खासदारांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांच्या विलीनीकरणाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुढील कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

या सर्व घडामोडींमुळे नाशिकमधील राजकीय समीकरणे ढवळून निघाली असून ‘मातोश्री’वरील बैठकीत काय निर्णय होतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

6 बंडखोर खासदारांना अरविंद सावंत यांचे खरमरीत पत्र

उबाठातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीनीकरणाचा दावा केल्यानंतर राज्यासह दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. उबाठाने बंडखोर खासदारांविरोधातही आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार अरविंद सावंत या सहा बंडखोर खासदारांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये संजय दिना पाटील, संजय जाधव, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर, संजय देशमुख आणि नागेश आष्टीकर यांचा समावेश आहे.

अरविंद सावंत यांनी एक्सवरील पोस्टमध्ये स्पष्ट केले की, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हा मूळ पक्ष कुठल्याही पक्षात विलीन झालेला नाही आणि होऊ शकत नाही. कायद्यानुसार मूळ पक्षाच्या संमतीशिवाय लोकप्रतिनिधींना स्वतःहून विलीनीकरणाचा कोणताही अधिकार नाही. कथित ‘विलीनीकरणाचा’ दावा घटनात्मक दृष्ट्या पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पक्षाची अधिकृत भूमिका संबंधित खासदारांना अधिकृत पत्राद्वारे सूचित केली आहे. तसेच, माहिती व संदर्भासाठी पत्रांची प्रत सन्माननीय लोकसभा अध्यक्ष श्री. ओम बिर्लाजी यांना देखील पाठविली आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या