विनोदी अभिनेते संतोष चोरडि यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पुणे

प्रसिद्ध अभिनेते, स्टँड-अप कॉमेडियन आणि विनोदी कलाकार संतोष चोरडिया यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी पुण्यात वयाच्या ५७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. चोरडिया यांच्या पश्चात भाऊ, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी पुण्यासह जगभरातील लोकांना आपल्या विनोदी अभिनयाने हसवले होते. अलीकडेच त्यांना विनोदोत्तम फाऊंडेशनतर्फे ‘विनोद वीर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली ४० वर्षे त्यांनी थिएटर, टेलिव्हिजन आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. भारतीय संगीत, नाटक, लोककला, शास्त्रीय नृत्य या ललित कलांच्या क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या नवोदित कलाकारांना प्रोत्साहन आणि व्यासपीठ उपलब्ध करून देऊन चोरडिया यांनी २०२१ मध्ये ‘रंगकर्मी चोरडिया फाउंडेशन’ची स्थापना केली होती. त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून फाउंडेशनचे काम केले होते. त्यांचे सामाजिक कार्यही मोठे होते. अनेक कर्करोगग्रस्त, मूक, अनाथ, एचआयव्ही ग्रस्त लोकांसाठी त्यांनी काम केले होते. त्यांना ‘हास्यसम्राट’ ही पदवी देण्यात आली होती. ‘दुसरी जोश’, ‘कॅपुचीनो’, ‘दगडाबाईची चाळ’, ‘प्रेमा’, ‘सरगम’ इत्यादी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयाची झलक दाखवून सर्वांना खळखळून हसवले. केवळ भारतातच नव्हे तर लंडन, इस्रायल, ओमानमध्येही त्यांच्या अभिनयाचे चाहते आहेत. चोरडिया यांच्या निधनाने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top