संसद घुसखोरी! ललितसह दोन फरार! 9 सुरक्षारक्षक,14 खासदार निलंबित

नवी दिल्ली- संसदेतील सुरक्षा भंग प्रकरणाचे पडसाद आज दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. विरोधी पक्षाच्या खासदारांनी सुरक्षा व्यवस्थेवर चर्चेची मागणी करत दोन्ही सभागृहात गदारोळ केला. गोंधळ घालणाऱ्या लोकसभेतील काँग्रेस व अन्य पक्षांच्या एकूण 14 आणि राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन अशा एकूण 15 खासदारांना संपूर्ण हिवाळी अधिवेशन कार्यकाळासाठी निलंबित करण्यात आले होते. पण द्रमुकचे एस.आर. पार्थिबन आज लोकसभेत हजरच नसल्याने त्यांचे नाव निलंबित खासदारांच्या यादीत चुकून आले. नंतर ते हटविण्यात आले. त्यामुळे आता निलंबित खासदारांची संख्या 14 आहे. दुसरीकडे, संसदेतील सुरक्षाभंग प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कठोर कारवाई करत आठ सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले. संसदेत घुसखोरी करणाऱ्या चौघांना काल अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली.
संसदेचे सुरक्षा कवच भेदून काल चार तरुणांनी पिवळ्या धुराची नळकांडी फोडत लोकसभा सभागृहात व संसदेबाहेर घोषणाबाजी केली. या प्रकरणाचे पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. लोकसभेचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरू होताच, विरोधी पक्षाच्या खासदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. कालच्या सुरक्षा भंग प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करत ‘अमित शहा न्याय करो, अमित शहा जवाब दो’ अशा घोषणा खासदार देत होते. गदारोळामुळे आधी 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब केले, पण नंतर पुन्हा गदारोळ सुरूच राहिल्यामुळे 3 वाजता कामकाज पुन्हा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. गोंधळ घालणाऱ्या 14 खासदारांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडून त्यांचे निलंबन करण्यात आले. यात काँग्रेसचे 9, द्रमुकचे 2 तर कम्युनिस्ट पक्षाच्या 2 खासदारांचा समावेश आहे. टीएन प्रतापन, हिबी इडन, एस जोथिमनी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोसे, मणिकाम टागोर, बेन्नी बेहनन, के. श्रीकंदन, मोहम्मद जावेद हे काँग्रेसचे खासदार, पी. आर. नटराजन, एस. वेंकटेशन हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे खासदार, कन्निमोळी एस.आर. पार्थिवन हे द्रमुकचे खासदार आणि के. सुब्वारायन हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे खासदार अशा एकूण 14 जणांना लोकसभेतून उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आले होते. पण द्रमुकचे खासदार एस. आर. पार्थिबन हे आज सभागृहात उपस्थितच नव्हते. तरीही चुकून निलंबित खासदारांच्या यादीत त्यांचे नाव आले. मात्र ही बाब इतर सदस्यांनी सभापतींच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांचे नाव हटविण्याचे आदेश देण्यात आले. राज्यसभेतही सदस्यांनी कामकाज होऊ दिले नाही. तिथेही घोषणाबाजीमुळे आधी 12 वाजेपर्यंत, नंतर 2 वाजेपर्यंत कामकाज तहकूब झाले, पुन्हा दुपारी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. ‘गृहमंत्री शरम करो, मोदी सरकार हाय हाय, पीएम सदन में आओ’ अशा घोषणा खासदारांनी दिल्या. तृणमूलचे खासदार डेरिक ओब्रायन यांनी हौदात उतरून राज्यसभा अध्यक्षांच्या खुर्चीसमोरील भागात जाऊन हातवारे करत युक्तिवाद केला. यावर संतापलेले राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी ओब्रायन यांना ताबडतोब सभागृहाबाहेर जा, असे सुनावले. यानंतर भाजप खासदार पियुष गोयल यांनी ओब्रायन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला आणि सभापतींनी तो मंजूर करत ओब्रायन यांना संपूर्ण सत्रासाठी निलंबित केले.
संसदेचे कडेकोट सुरक्षा कवच भेदून हे तरुण सभागृहात धूर सोडणारी नळकांडी घेऊन घुसले होते. सुरक्षा व्यवस्थेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या चुकीची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली. या प्रकरणी लोकसभा सचिवालयाने कारवाई करत 8 सुरक्षा कर्मचाऱ्यांना निलंबित केले. रामपाल, अरविंद, वीरदास, गणेश, अनिल, प्रदीप, विमित, नरेंद्र अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. संसदेतील सुरक्षा व्यवस्थेत कालच्या घटनेनंतर वाढ करण्यात आली आहे. मकरद्वारातून प्रवेश बंद करण्यात आला आहे. मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांनाही आज मकरद्वारावर रोखले होते. खासदारांच्या चालकांनाही पासशिवाय प्रवेशबंदी करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधींनाही जुन्या संसदेच्या गेट क्र. 12 जवळच्या लॉनमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे. संसदेच्या विविध सहा दरवाजांतून यापुढे वेगवेगळ्या व्हीव्हीआयपी एंट्री होतील. गजद्वारातून पंतप्रधान, हंसद्वारातून लोकसभा अध्यक्ष, अश्वद्वारातून राज्यसभा सभापती, मकरद्वारातून खासदारांना, शार्दूलद्वारातून राज्यांचे मुख्यमंत्री आणि गरुडद्वारातून माध्यम प्रतिनिधींना प्रवेश मिळेल.
संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी संसद सुरक्षा भंग प्रकरणी म्हणाले की, कालची घटना गंभीर होती. लोकसभा अध्यक्षांनी सर्व खासदारांची एक बैठकही घेतली. त्यांच्या सुरक्षेसंबंधीच्या सूचना ऐकल्या. त्या अंमलातही आणल्या जातील, पण या घटनेचे राजकारण करायला नको. दरम्यान, संसदेतील सुरक्षा भंग घटनेची गंभीर दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्रीय मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी संसदेतील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी आणि अनुराग ठाकुर उपस्थित होते.
दरम्यान, लोकसभा सचिवालयाच्या विनंतीवरून सुरक्षा त्रुटींची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक अनिश दयाल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, समितीमध्ये इतर सुरक्षा एजन्सीचे सदस्य आणि तज्ज्ञांचाही समावेश करण्यात आला आहे. सुरक्षेतील त्रुटीचे कारण शोधून कारवाईची शिफारस करणे हे समितीचे काम आहे.
कोलकात्याचा नीलाक्ष कोण?
संसदेत घुसखोरी करण्याचा कट एकूण सहा जणांनी शिजवला. त्यापैकी पाच जण प्रत्यक्ष संसदेत आणि आवारात उपस्थित होते. दोन जणांनी सभागृहात उड्या मारल्या. दोन जणांनी संसदेबाहेर घोषणाबाजी केली. या चौघांकडेही पिवळ्या धुराच्या नळकांड्या होत्या. संसदेत त्यांनी जो प्रकार केला त्यासाठी खूप आधी त्यांनी तयारी केली होती. अमोल शिंदे रंगीत धुराची नळकांडी घेऊन आला, त्याचे इंडिया गेटवर चौघांमध्ये वाटप झाले. हे सर्व 10 डिसेंबरलाच दिल्लीलापोहोचले होते आणि काल संसदेत जे घडले ते खरे तर 14 डिसेंबरला म्हणजे आज घडणार होते. पण त्यांना 13 डिसेंबरचे पास मिळाल्याने हा सर्व प्रकार त्यांनी काल घडवून आणला. अमोल शिंदेने वडिलांना पोलीस भरतीसाठी जात असल्याचे सांगितले होते. आतापर्यंत शारीरिक चाचणीत तो उत्तीर्ण झाला होता, पण पुढे त्याला यश येत नव्हते. तो बेरोजगार असल्याने त्रस्त होता, असे त्याच्या आईने सांगितले.
संसदेच्या आवारात असलेल्या अमोल शिंदे आणि नीलम यांचे व्हिडिओ शूटिंग पाचवा आरोपी ललित झा हा करत होता. त्याच्याकडेच त्यांचे मोबाईलही होते. ललित झा आणि या कटातील पाचवा आरोपी फरार आहे. अमोल शिंदे, नीलम, मनोरंजन डी. आणि सागर शर्मा यांना दुपारी पतियाळा कोर्टात हजर करण्यात आले. चौघांना 15 दिवसांचा रिमांड द्या, अशी मागणी दिल्ली पोलिसांना केली होती. मात्र न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची कोठडी सुनावली. बेरोजगारी आणि मणिपूर हिंसेसारख्या घटनांमुळे आपल्या मनात असंतोष होता, म्हणून खासदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी संसदेत घुसखोरी केल्याचे आरोपींनी न्यायालयाला सांगितले. फरार आरोपी ललित झा याला शोधण्यासाठी पोलिसांनी 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले. त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन राजस्थानातील नीमराना होते. ललित झाने संसदेच्या आवारात जे व्हिडिओ शूटिंग केले ते कोलकात्यातील एक एनजीओ सदस्य नीलाक्ष याला शेअर केले होते, असे दोघांच्या चॅटवरून पोलिसांना कळले. नीलाक्ष कोण याचीही चौकशी पोलीस करत आहेत. अटक झालेल्या चौघांपैकी सागर शर्मा याने या घटनेपूर्वी आपण जिंकू किंवा हरू, पण प्रयत्न करत राहायला हवे, अशी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर केली होती. आरोपी नीलम ही हरियाणातील उच्चशिक्षित महिला आहे. ती यापूर्वी शेतकरी आणि कुस्तीपटूंच्या आंदोलनातही होती. तिचा भाऊ रामनिवास म्हणाला की, चुकीचे काही घडत असेल तर कोणीतरी बोलायला हवे. हे नीलमचे एकटीचे काम नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top