CBSE OSM Controversy : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) इयत्ता १२ वीच्या पुनर्मूल्यांकन (Re-evaluation) प्रक्रियेवरून सुरू असलेला वाद आता अधिकच पेटला आहे. एका १२ वीच्या विद्यार्थ्याने पुनर्मूल्यांकन निकालात तफावत असल्याचा आरोप केल्यानंतर, सीबीएसई बोर्डाने त्याचे दावे फेटाळत त्याला ‘खोटारडा’ ठरवले होते. मात्र, आता संबंधित विद्यार्थी वेदांत श्रीवास्तव याने बोर्डाला सडेतोड उत्तर देत, “वाढलेले ९ गुण पुनर्मूल्यांकनाचे नसून, बोर्डाने माझी उत्तरपत्रिका बदलल्यामुळे ते माझे मूळचेच गुण होते,” असा खळबळजनक प्रतिदावा केला आहे. या प्रकरणाने आता सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही मोठे वादळ निर्माण केले आहे.
“११ प्रश्नांचे अर्ज करून मिळाले फक्त २ गुण”; विद्यार्थ्याचा व्हीडिओ व्हायरल
या संपूर्ण वादाची सुरुवात वेदांत श्रीवास्तव याने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हीडिओपासून झाली. वेदांतने सांगितले, “मला माझ्या १२ वीच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल मिळाला आहे. मी एकूण ११ प्रश्नांच्या पुनर्मूल्यांकनासाठी रीतसर अर्ज केला होता. परंतु, या संपूर्ण प्रक्रियेनंतर माझ्या एकूण गुणांमध्ये केवळ २ गुणांचीच वाढ झाली आहे. यात संगणक शास्त्र (Computer Science) विषयात १ गुण आणि गणितात (Maths) १ गुण वाढला आहे.” पुनर्मूल्यांकन प्रक्रियेतील या त्रुटींवर बोट ठेवत त्याने नाराजी व्यक्त केली होती.
सीबीएसई मंडळाचा दावा: “विद्यार्थ्याचे आरोप तथ्यहीन आणि धादांत खोटे”
वेदांतचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सीबीएसई बोर्डाने तात्काळ यावर स्पष्टीकरण जारी केले. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने वेदांतचे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावले आणि ते ‘तथ्यहीन’ तसेच ‘धादांत खोटे’ असल्याचे म्हटले. बोर्डाच्या मते, वेदांतच्या दाव्याच्या उलट त्याच्या भौतिकशास्त्र (Physics) या विषयात तब्बल ९ गुण वाढले आहेत. तसेच, १२ वीच्या निकालानंतर पुनर्मूल्यांकनासाठी आलेल्या अर्जांपैकी ९९.७ टक्के अर्ज निकाली काढण्यात आले असून, उर्वरित अर्ज अंतिम टप्प्यात असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले.
उत्तरपत्रिका अदलाबदलीचा गंभीर आरोप; वेदांतचा पलटवार
सीबीएसईच्या दाव्यानंतर वेदांत श्रीवास्तव याने ‘एक्स’या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून थेट बोर्डाला आव्हान दिले. तो म्हणाला, “बोर्ड ज्या ९ गुणांच्या वाढीचा उल्लेख करत आहे, ते गुण मला पुनर्मूल्यांकन प्रक्रियेतून मिळालेले नाहीत. ते माझे खरे आणि हक्काचे गुण आहेत, जे बोर्डाने आधी मला दिलेच नव्हते; कारण तुम्ही माझी उत्तरपत्रिका दुसऱ्या उत्तरपत्रिकेशी बदलली (Exchange) होती. पुनर्मूल्यांकनात माझे फक्त २ च गुण वाढले आहेत, जे संगणक शास्त्र आणि गणितात प्रत्येकी १ याप्रमाणे आहेत. ज्या बदललेल्या उत्तरपत्रिकेबद्दल मी आधी तक्रार केली होती, त्यात पुनर्मूल्यांकनानंतर एकही गुण वाढलेला नाही.”
कोण आहे वेदांत श्रीवास्तव? उत्तरपत्रिका अदलाबदलीचा जुना वाद
वेदांत श्रीवास्तव हा काही दिवसांपूर्वीच एका मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आला होता, जेव्हा त्याने आपल्या भौतिकशास्त्राच्या (Physics) उत्तरपत्रिकेत झालेल्या मोठ्या घोळाचा पर्दाफाश केला होता. सीबीएसईने १३ मे रोजी १२ वीचा निकाल जाहीर केला. त्यानंतर १९ मे रोजी वेदांतला भौतिकशास्त्रात अपेक्षेपेक्षा अत्यंत कमी गुण मिळाल्याचे समजले. जेव्हा त्याने आपल्या उत्तरपत्रिकेची स्कॅन केलेली प्रत (Scanned Copy) मागवून पाहिली, तेव्हा त्याच्या रोल नंबरशी जोडलेली भौतिकशास्त्राची उत्तरपत्रिका त्याची नसून दुसऱ्याच कोणाची तरी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले.
वेदांतची ‘एक्स’वरील भावनिक पोस्ट:
“मी या परीक्षेसाठी वर्षभर कठोर परिश्रम केले. माझी झोप, मनःशांती, फिरणे आणि सर्व सुखांचा त्याग केला. पण आता माझी मूळ उत्तरपत्रिका तपासली गेली की नाही, हेच मला माहीत नाही. काय विद्यार्थ्यांना खरोखर अशी वागणूक मिळायला हवी?” त्याच्या या पोस्टनंतर ‘ऑन-स्क्रीन मार्किंग’ (OSM) मूल्यमापन पद्धतीतील अनेक त्रुटी इतर विद्यार्थ्यांनीही समोर आणल्या होत्या.
ट्रोलिंग आणि राहुल गांधींचा खंबीर पाठिंबा
आपल्या हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या १७ वर्षीय वेदांतला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग आणि अपशब्दांचा सामना करावा लागला होता. काही कट्टरपंथी युजर्सनी त्याला चक्क ‘अँटी-नॅशनल’ (देशद्रोही) आणि ‘पाकिस्तानी’ असे लेबल लावले होते. मात्र, या ट्रोलिंगविरुद्ध देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि वेदांतला मोठा पाठिंबा मिळाला.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही वेदांतच्या समर्थनार्थ उडी घेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. राहुल गांधी म्हणाले होते, “उत्तरपत्रिकेचे चुकीचे मूल्यमापन झाल्यामुळे न्याय मिळवण्याच्या आशेने एका १७ वर्षांच्या मुलाने सोशल मीडियाचा आसरा घेतला. परंतु, त्याला मदत करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या आयटी सेलने (IT Cell) त्याला ‘देशद्रोही’, ‘सोरोसचा एजंट’ आणि ‘डीप स्टेट’चा भाग म्हणून हिणवले.”










