Navy rescue operation in Arabian Sea : अरबी समुद्रातून ओमानहून भारताकडे प्रवास करणाऱ्या एका मालवाहू जहाजाला भीषण तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागल्याने ते भरसमुद्रात अडकून पडले होते. या कठीण प्रसंगात पाकिस्तानच्या नौदलाने तत्परता दाखवत ‘एमव्ही गौतम’ (MV Gautam) या जहाजाला मदतीचा हात दिला आणि सात कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवले. पाकिस्तान लष्कराने मंगळवारी एका अधिकृत पत्रकाद्वारे या बचावकार्याची माहिती दिली.
भरकटलेल्या जहाजाला नौदलाचा मदतीचा हात
‘एमव्ही गौतम’ हे जहाज ओमानहून भारताच्या दिशेने येत असताना अचानक त्यामध्ये गंभीर तांत्रिक बिघाड झाला. यामुळे जहाजाची गती थांबली आणि ते समुद्राच्या लाटांवर भरकटू लागले. जहाजावरील कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी संकट संदेश (Distress Call) पाठवला होता. या संदेशाला प्रतिसाद देत पाकिस्तान नौदलाने तात्काळ आपली ‘काश्मीर’ ही युद्धनौका घटनास्थळी रवाना केली. नौदलाच्या पथकाने जहाजाची पाहणी करून त्यातील बिघाड दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक साहाय्य उपलब्ध करून दिले.
सात कर्मचाऱ्यांची सुरक्षित सुटका
या जहाजावर एकूण सात कर्मचारी तैनात होते, ज्यामध्ये सहा भारतीय आणि एका इंडोनेशियन नागरिकाचा समावेश होता. समुद्राच्या मध्यभागी अडकल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पाकिस्तानी नौदलाच्या जवानांनी या सर्व कर्मचाऱ्यांना अन्नपदार्थ, पिण्याचे पाणी आणि आवश्यक वैद्यकीय उपचार पुरवले. जहाजाची स्थिती स्थिर करून कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित केल्यानंतरच बचाव पथकाने निरोप घेतला.
मानवतावादी दृष्टिकोनातून मदत
समुद्री नियमांनुसार आणि मानवतावादी दृष्टिकोनातून करण्यात आलेल्या या मदतीचे महत्त्व अधोरेखित होत आहे. अशा प्रकारची ही पहिलीच घटना नसून, गेल्या महिन्यातही पाकिस्तान नौदलाने उत्तर अरबी समुद्रात एका व्यापारी जहाजातील १८ कर्मचाऱ्यांची सुटका केली होती.











