Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत विक्रमी मताधिक्याने विजय मिळवल्यानंतर सुनेत्रा पवार आता राज्याच्या राजकारणात सक्रिय होणार आहेत. मात्र, त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार, यावरून पक्षात आता रस्सीखेच सुरू झाली असून अनेक बड्या नेत्यांनी या पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
खासदारकीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी-
सुनेत्रा पवार यांनी बुधवारी दिल्लीत उपराष्ट्रपतींची भेट घेऊन आपला राजीनामा सुपूर्द केला. या रिक्त जागेवर जाण्यासाठी आनंद परांजपे, भुजबळ कुटुंब, मलिक कुटुंब यांसह अविनाश आदिक आणि विक्रम काकडे यांची नावे आघाडीवर आहेत. या महत्त्वाकांक्षी नेत्यांनी आपली वर्णी लागावी यासाठी पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. राज्यसभेत सध्या राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल (कार्यकाळ २०३०), नितीनकाका पाटील (कार्यकाळ २०२८) आणि पार्थ पवार (कार्यकाळ २०३२) हे तीन खासदार कार्यरत आहेत.
पक्षातील प्रमुख पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त-
केवळ खासदारकीच नव्हे, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अनेक महत्त्वाची संघटनात्मक पदे रिक्त असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
१. युवक प्रदेशाध्यक्ष: सूरज चव्हाण यांना पदावरून दूर केल्यानंतर गेल्या १० महिन्यांपासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही.
२. महिला प्रदेशाध्यक्ष व महिला आयोग: रुपाली चाकणकर यांनी राजीनामा देऊन दोन महिने उलटले तरी महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.
३. मुंबई अध्यक्ष: विधानसभा निवडणुकीच्या वेळी समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या घटनेला आता दोन वर्षे पूर्ण होत आली असून, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील अध्यक्षपद अजूनही प्रभारी अवस्थेत किंवा रिक्त आहे.
बारामतीतील ऐतिहासिक विजय आणि पुढची चाल-
अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी दोन लाखांहून अधिक मताधिक्य मिळवत आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले. या दणदणीत विजयानंतर त्यांनी केंद्रातील राजकारण सोडून राज्यात परतण्याचा निर्णय घेतला आहे. सुनेत्रा पवारांनी राज्यसभा सोडल्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढताना पक्षाला जात, प्रदेश आणि निष्ठा या सर्व समीकरणांचा विचार करावा लागणार आहे.











