Talminadu CM : तामिळनाडूत निवडणूक निकालानंतर गेले चार दिवस चाललेल्या राजकीय नाट्यामध्ये अखेर विजय यांनी बाजी मारली. काँग्रेसच्या पाठिंब्यानंतरही बहुमताचा आकडा गाठू न शकलेल्या विजय यांना आज भाकपा, माकपा, व्हीसीके, मुस्लीम लीग आणि एएमएमके या पाच पक्षांनी पाठिंबा देऊ केल्याने त्यांच्याकडे 121 चे संख्याबळ झाले. त्यामुळे विजय यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल 4 मे रोजी जाहीर झाला. थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला दाक्षिणात्य जनतेने भरभरून कौल दिला आणि पहिल्याच निवडणुकीत 108 जागा जिंकून टीव्हीके हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यानंतर सरकार स्थापन करण्याची कसरत सुरू झाली. सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी टीव्हीकेला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देणे अपेक्षित होते. मात्र दोन दिवस उलटले तरी राज्यपालांचे निमंत्रण आले नाही. त्यामुळे 6 मे रोजी विजय यांनी पहिल्यांदा राज्यपालांची भेट घेतली. मात्र राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी आधी 118 आमदारांचे पाठिंब्याचे पत्र घेऊन या, असे म्हणत थलापती विजय यांना माघारी धाडले. दुसर्या दिवशी 7 मे रोजी विजय यांनी दुसर्यांदा राज्यपालांची भेट घेतली. पण राज्यपालांनी दुसर्यांदाही विजय यांना रिकाम्या हाती माघारी धाडले. त्यांच्या या आडमुठ्या भूमिकेवर विरोधकांनी टीकेचा भडिमार केला. पण राज्यपाल आपल्या भूमिकेपासून तसूभरही हलायला तयार नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या टीव्हीकेच्या आमदारांनी आज सामूहिक राजीनामा देण्याचा इशारा दिला होता.
दुसरीकडे एकमेकांचे कट्टर वैरी द्रमुक आणि अण्णा द्रमुक पन्नास वर्षांनंतर सत्तास्थापनेसाठी एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली होती. या सर्व घडामोडी होत असताना भाकपा आणि माकपा नेत्यांची बैठक संपन्न झाली. या पक्षांकडे प्रत्येकी दोन दोन आमदार आहेत.त्यांनी टीव्हीकेला पाठिंबा जाहीर करताच विजय यांच्याकडे 116 आमदार झाले. तरीही बहुमतासाठी दोन आमदारांची गरज होती. ती गरज व्हीसीकेने भागवली. तसेच अम्मा मक्कल मुनेत्र कळघम (एएमएमके) आणि इंडियन युनियन मुस्लीम लिग यांनीही पाठिंबा दिल्याने हे संख्याबळ बहुमतापेक्षा जास्त म्हणजे 121 वर पोहोचले.










