‘वेड लागलेल्या माणसाशी बोलण्याची इच्छा नाही’, डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप, मस्क यांच्याशी बोलणे टाळले

Donald Trump Elon Musk Feud

Donald Trump Elon Musk Feud | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्ला-स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांच्यातील सोशल मीडियावरील शाब्दिक युद्ध आता मोठ्या राजकीय आणि आर्थिक वादात रूपांतरित झाले आहे. या वादामुळे मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे तब्बल $150 अब्ज इतके बाजारमूल्य घटले, तर डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर त्यांच्या अध्यक्षपदाला हादरा देणारे आरोप होत आहेत.

या वादानंतर दोघांमधील तणाव कमी व्हावा म्हणून फोनवर बोलणे होण्याची शक्यता होती. व्हाईट हाऊसमधील एका अधिकाऱ्याने कॉलबाबत संकेत दिले, पण लगेचच दुसऱ्या अधिकाऱ्याने असा कोणतेही बोलणे होणार नसल्याचे स्पष्ट केले. याबाबत बोलताना ट्रम्प यांनी “वेड लागलेल्या माणसाशी मला बोलण्याची विशेष इच्छा नाही,” अशी उपरोधिक टिप्पणी केली.

ट्रम्प यांनी सार्वजनिकरित्या मस्क यांच्यावर टीका करत त्यांच्या सरकारच्या करारांना धोका असल्याचे सूचित केले, तर मस्क यांनीही ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याचा इशारा दिला आणि एपस्टाईन प्रकरणात त्यांचे नाव असल्याचा आरोप केला. यामुळे दोघांमध्ये सुरू असलेला वाद चिघळला.

या साऱ्या वादाचे मूळ ‘वन बिग ब्युटीफुल बिल’ या वादग्रस्त विधेयकात होते. या विधेयकामुळे इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना दिल्या जाणाऱ्या कर सवलती रद्द करण्यात आल्या. या निर्णयाचा मोठा फटका टेस्लाला बसला असून, कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 14% घसरण झाली.

इलॉन आणि माझे चांगले संबंध होते. मला माहीत नाही की यापुढे ते असेच राहतील का,” असे ट्रम्प यांनी या सर्व घडामोडींपूर्वी म्हटले होते. यानंतर आता दोन शक्तिशाली व्यक्तींमधील सोशल मीडियावरील शाब्दिक युद्ध अमेरिकेसह जगभरात चर्चेचा विषय ठरले आहे.