PM Modi’s Croatia visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच क्रोएशिया या देशाची दौरा पूर्ण केला. या देशाला भेट देणार मोदी हे पहिलेच भारतीय पंतप्रधान आहेत. या दौऱ्यात त्यांनी क्रोएशियाचे पंतप्रधान आंद्रेज प्लेनकोविच यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध, व्यापार, तंत्रज्ञान आणि संरक्षण सहकार्यावर सविस्तर चर्चा केली. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही भेट भारत-क्रोएशिया मैत्रीला नवीन उंचीवर घेऊन जाणारी ठरली आहे.
पंतप्रधान मोदींचा हा क्रोएशिया दौरा त्यांच्या तीन देशांच्या भेटीचा एक भाग होता. याआधी त्यांनी सायप्रस आणि कॅनडाला भेट दिली. G7 समिटनंतर त्यांनी क्रोएशियाला भेट दिली. झाग्रेबमधील बँस्की ड्वोरी येथे दोन्ही नेत्यांमध्ये शिष्टमंडळ-स्तरीय चर्चा झाली, ज्यामध्ये जागतिक शांतता, लोकशाही मूल्ये आणि सांस्कृतिक सहकार्यावर विशेष भर देण्यात आला.
पंतप्रधान मोदींचे उद्गार: “झाग्रेबमुळे घरी असल्यासारखे वाटले”
पंतप्रधान मोदींनी झाग्रेबच्या सौंदर्याचे आणि तिथल्या लोकांच्या उबदारपणाचे कौतुक केले. “झाग्रेबसारख्या सुंदर शहरात येण्याची संधी मिळाल्याने मी आनंदित आहे. हा दौरा छोटा असला तरी शहराची संस्कृती, लोकांचा उत्साह आणि त्यांचा उबदारपणा मला अनुभवायला मिळाला. मला येथे घरी असल्यासारखे वाटले,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले, “आजचा दिवस भारत-क्रोएशिया संबंधांसाठी महत्त्वाचा आहे. आम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, जे दोन्ही देशांमधील सहकार्याला नवीन दिशा देतील.”
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी दहशतवादाला मानवतेचा शत्रू संबोधत त्याचा तीव्र निषेध केला. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर क्रोएशियाने भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले.
व्यापार आणि नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्य
दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय व्यापार वाढवण्यावर सहमती दर्शवली. फार्मास्युटिकल्स, कृषी, माहिती तंत्रज्ञान, स्वच्छ तंत्रज्ञान, रिन्यूएबल एनर्जी आणि सेमीकंडक्टर्स यासारख्या नवीन क्षेत्रांमध्ये सहकार्याला चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षण क्षेत्रातही सहकार्य वाढवण्यासाठी दीर्घकालीन योजना तयार करण्यात येणार आहे, ज्यात संयुक्त प्रशिक्षण आणि लष्करी देवाणघेवाण यांचा समावेश असेल.
चार महत्त्वाचे MoU आणि हिंदी चेअरची स्थापना
या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी चार मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग (MoU) वर स्वाक्षऱ्या केल्या:
- कृषी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये सहकार्य
- 2026-2030 साठी सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम
- 2025-2029 साठी विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्य
- झाग्रेब विद्यापीठात हिंदी चेअरची स्थापना
हिंदी चेअरच्या स्थापनेमुळे भारत आणि क्रोएशियामधील सांस्कृतिक संबंधांना अधिक बळ मिळेल. याशिवाय, पंतप्रधान मोदींनी क्रोएशियामध्ये योगाच्या वाढत्या लोकप्रियतेचे कौतुक केले आणि 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा होईल, असा विश्वास व्यक्त केला.
क्रोएशियन राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
पंतप्रधान मोदींनी क्रोएशियाचे राष्ट्राध्यक्ष झोरान मिलानोविच यांचीही भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी लोकशाही, बहुलवाद आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांवर आधारित सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. बहुपक्षीय मंचांवर सहकार्य विस्तारण्यावरही भर देण्यात आला.