Donald Trump Asim Munir Meeting | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिम मुनीर यांची भेट घेतली. मे 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या लष्करी तणावानंतर ट्रम्प यांनी मुनीर यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली आहे.
ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानमधील अणुयुद्ध टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मुनीर यांनी म्हटलो होते. त्यानंतर ही भेट आयोजित करण्यात आली होती. एवढेच नाही तर मुनीर यांनी ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकनाची मागणी देखील केली होती.
व्हाईट हाऊसने असीम मुनीर आणि ट्रम्प यांच्या या भेटीची माहिती दिली. दोन्ही अणुशक्ती असलेल्या भारत-पाकिस्तानमधील संभाव्य संघर्ष थांबवण्यात ट्रम्प यांच्या भूमिकेचे कौतुक करणाऱ्या मुनीर यांच्या टिप्पणीची दखल म्हणून ही भेट आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, भारताच्या ठाम भूमिकेनंतरही ट्रम्प यांनी आपल्या हस्तक्षेपाने संकट टळल्याचा दावा केला. पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष सुरू होता. मी दोन अणुशक्ती संपन्न देशांमधील युद्ध थांबवले.” त्यांनी मोदी आणि मुनीर यांच्या भूमिकेचे कौतुक केले, पण अमेरिकेच्या मुत्सद्देगिरीचा वाटा महत्त्वाचा असल्याचेही नमूद केले. ट्रम्प यांनी भारतासोबत लवकरच व्यापार करार होण्याची शक्यताही व्यक्त केली.
मोदींचा स्पष्ट संदेश: मध्यस्थीला थारा नाही
ट्रम्प – मुनीर यांच्या या भेटीच्या काही तास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्याशी 35 मिनिटे फोनवर चर्चा केली होती. मे महिन्यातील चार दिवसांच्या तणावानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धविराम (Ceasefire) थेट लष्करी संवादामुळे शक्य झाला, कोणत्याही बाह्य मध्यस्थीमुळे नाही, असे मोदींनी स्पष्ट केले होते. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, भारताने इस्लामाबादसोबतच्या द्विपक्षीय मुद्द्यांमध्ये तिसऱ्या पक्षाचा सहभाग कधीच स्वीकारलेला नाही आणि भविष्यातही स्वीकारणार नाही.
मिस्री यांनी सांगितले की, ट्रम्प आणि मोदी यांनी कॅनडातील G7 शिखर परिषदेत भेटण्याची योजना आखली होती, परंतु मध्य पूर्वेतील संकटामुळे ती रद्द झाली. ट्रम्प यांनी मोदींना अमेरिका भेटीचे निमंत्रण दिले, परंतु पूर्वनियोजित वचनबद्धतेमुळे मोदींनी ते नाकारले. त्याऐवजी, मोदींनी ट्रम्प यांना 2025 च्या उत्तरार्धात भारतात होणाऱ्या क्वाड शिखर परिषदेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले.