इंदूर – इंदूरचे व्यावसायिक राजा रघुवंशी यांच्या हत्येप्रकरणी (Raja Raghuvanshi murder case) रोज नव नवी माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान पोलिसांना (Police) असे आढळले की १ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत राजाची पत्नी आणि हत्येतील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी (Sonam Raghuvanshi) हिने संजय वर्मा नावाच्या एका व्यक्तीला तब्बल २३४ फोन कॉल केले होते.पण हा संजय वर्मा कोण याचा उलगडा होत नव्हता.अखेर सोनमचा प्रियकर राज कुशवाह हाच संजय वर्मा असल्याचे आढळून आले.
पोलिसांच्या तपासात ट्रू कॉलर (Truecaller) या मोबाईल अॅपवरून संजय वर्मा हे पुढे आले. पोलिसांनी हा संजय वर्मा कोण याचा छडा लावण्यासाठी सोनम आणि राजा यांच्या कुटुंबियांकडे चौकशी केली. पण दोघांच्या कुटुंबियांनी संजय वर्मा नावाच्या व्यक्तीला आपण ओळखत नाही,असे सांगितले. त्यामुळे सुरुवातीला पोलीस चक्रावून गेले.
पण नंतर तपासात असे आढळून आले की, राज कुशवाहने राजा रघुवंशीच्या हत्येचा कट सोनम आणि राजा यांच्या साखरपुड्यादिवशीच रचला होता. त्यासाठी त्याने संजय वर्मा नावाने एक नवीन सीमकार्ड विकत घेतले होते.याच नंबर तो आणि सोनम एकमेकांच्या संपर्कात होते.