Massive Data Breach | इंटरनेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यांमध्ये कोट्यावधी लोकांची खासगी माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे. सर्वात मोठ्या सायबर हल्ल्यात 16 अब्जाहून अधिक पासवर्ड ऑनलाइन लीक झाले आहेत.
रिपोर्टनुसार, या डेटा लीकमुळे फेसबुक, इंस्टाग्राम, गुगल सारखे प्लॅटफॉर्म वापरणाऱ्या लाखो यूजर्सचा वैयक्तिक डेटा धोक्यात आला आहे. यामुळे जगभरात फिशिंग स्कॅम्स, ओळख चोरी आणि खाते हॅकिंगच्या घटनांमध्ये वाढ होण्याची भीती आहे.
लीक झालेला डेटा कसा आहे?
सुरक्षा तज्ञांच्या मते, हा लीक केवळ जुन्या डेटाचा संग्रह नाही, तर ‘इन्फोस्टीलर’ मॅलवेअरद्वारे गोळा केलेली नवीन आणि सुव्यवस्थित माहिती आहे. हे मॅलवेअर यूजर्सच्या डिव्हाइसेसमधून युझरनेम आणि पासवर्ड गुपचूप चोरते आणि हॅकर्सना पाठवते, जे त्यांचा थेट वापर करतात किंवा डार्क वेबवर विक्रीसाठी ठेवतात.
लीकमध्ये ईमेल, फेसबुक, गुगल, टेलिग्राम, गिटहब डेव्हलपरचे अकाउंट्स आणि काही सरकारी पोर्टल्सचे लॉगिन तपशील समाविष्ट आहेत. डेटामध्ये वेबसाइट लिंक, युझरनेम आणि पासवर्ड क्रमवार दिलेले आहेत, ज्यामुळे हल्लेखोरांना वापर सोपा होतो.
या डेटा लीकमुळे सायबर गुन्हेगारीला चालना मिळण्याची शक्यता आहे. सुमारे 30 मोठ्या डेटा सेट्समध्ये लाखो ते अब्जावधी लॉगिन तपशील असून, एकूण संख्या 16 अब्जांहून अधिक आहे. डार्क वेबवर हा डेटा मर्यादित तांत्रिक ज्ञान आणि कमी पैशांत उपलब्ध आहे, ज्यामुळे सामान्य व्यक्तींपासून ते कंपन्या आणि संस्थांपर्यंत सर्वच असुरक्षित बनले आहेत.
काय करावे?
गुगलने यूजर्सला पारंपरिक पासवर्डऐवजी पासकीजसारख्या सुरक्षित पर्यायांचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. एफबीआयने एसएमएस किंवा ईमेलद्वारे येणाऱ्या संशयास्पद लिंक्सवर क्लिक न करण्याचा इशारा दिला आहे. सायबर सुरक्षा तज्ञांनी सर्व प्रमुख खात्यांचे पासवर्ड बदलणे, मजबूत आणि अद्वितीय पासवर्ड वापरणे, टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू करणे आणि पासवर्ड मॅनेजर ॲप्सचा वापर करण्याची शिफारस केली आहे.
यूजर्सने त्वरित आपल्या खात्यांचे पासवर्ड बदलावेत आणि संशयास्पद लिंक्स टाळावेत. डार्क वेब मॉनिटरिंग टूल्स तुम्हाला तुमचा ईमेल किंवा पासवर्ड लीक झाल्यास सतर्क करू शकतात.