IPL 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील वर्षी म्हणजेच २०२७ मधील आयपीएलचा सीझन नेहमीपेक्षा खूप आधी सुरू करण्याचा विचार करत आहे. भारतात एप्रिल आणि मे महिन्यांत पडणाऱ्या कडक उन्हाळ्याचा आणि उष्णतेच्या लाटेचा फटका खेळाडूंसह स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांनाही बसतो. हा त्रास टाळण्यासाठी बीसीसीआय वेळापत्रकात ऐतिहासिक बदल करण्याच्या तयारीत आहे.
आतापर्यंत आयपीएलचा सीझन मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होऊन मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला संपत असे. नुकताच पार पडलेला २०२६ चा सीझन २८ मार्च ते ३१ मे या कालावधीत खेळवला गेला होता. मात्र, २०२७ चा सीझन थेट १० मार्चपासून सुरू करण्याची योजना आखली जात आहे.
पाहा काय असेल नवीन संभाव्य विंडो?
बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना या संदर्भातील महत्त्वाची माहिती दिली आहे:
- १० मार्च ते १५ मे: पुढील वर्षी आयपीएलचा ऐतिहासिक २० वा सीझन १० मार्च रोजी सुरू करून १५ मे २०२७ पर्यंत संपवण्याचा बोर्डाचा प्रयत्न आहे.
- आधीचे नियोजन बदलले: यापूर्वी २०२४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, २०२७ चा सीझन १४ मार्च ते ३० मे दरम्यान खेळवला जाणार होता. मात्र, आता त्यात बदल करून स्पर्धा अधिक लवकर संपवली जाईल.
पाऊस आणि कडक ऊन; ‘या’ २ मोठ्या कारणांमुळे घेतला निर्णय
वेळापत्रकात बदल करण्यामागे प्रामुख्याने दोन नैसर्गिक कारणे समोर आली आहेत:
- अवेळी पाऊस आणि मान्सूनपूर्व वारे: मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचे आगमन होते. यामुळे प्लेऑफ आणि फायनलच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता असते.
- भीषण उन्हाळा: मे महिन्याच्या मध्यानंतर भारतातील तापमान प्रचंड वाढते. या कडक उन्हात सलग सामने खेळणे खेळाडूंच्या आरोग्यासाठी आणि सामना पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी अजिबात सोयीचे नसते.
खेळाडू आणि चाहत्यांच्या तक्रारींनंतर बीसीसीआय अॅक्शन मोडमध्ये
सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले की, अनेक खेळाडूंनी आणि चाहत्यांनी उन्हाळ्यातील त्रासाबद्दल बोर्डाकडे तक्रारी केल्या होत्या. सर्वच परदेशी किंवा स्थानिक खेळाडूंना इतक्या कडक उन्हात खेळण्याची सवय नसते. त्यामुळे स्पर्धेचे वातावरण अधिक आनंददायी करण्यासाठी १५ मे पर्यंत फायनल सामना उरकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
यासाठी बीसीसीआयच्या गेम डेव्हलपमेंट विभागाचे जनरल मॅनेजर आणि भारताचे माजी वेगवान गोलंदाज आबे कुरुविला यांना नवीन वेळापत्रकाची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयपीएलचा हा २० वा सीझन असल्याने तो अतिशय भव्य स्वरूपात साजरा केला जाणार आहे, त्यामुळे हवामानाचा कोणताही अडथळा येऊ नये याला बोर्डाचे पहिले प्राधान्य असेल.











