अचानक पायलटने दिला ‘मेडे’ कॉल, इंडिगो विमानाचे तातडीने बेंगळुरूत लँडिंग, कारण काय?

IndiGo Plan Emergency Landing

IndiGo Plan Emergency Landing | एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर विमान प्रवासाच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यातच आता आणखी एका विमानाला अचानक इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याची घटना समारो आली आहे.

गुवाहाटीहून चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या (IndiGo Plan Emergency Landing) विमानाला इंधन कमी झाल्याने बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या पायलटने ‘फ्यूल मेडे’ कॉल जारी केल्याने खळबळ उडाली. इंडिगोच्या 6E-6764 या विमानात 168 प्रवासी होते, आणि रात्री 8:15 वाजता ते बेंगळुरूत सुरक्षितपणे उतरले.

काय घडले?

हे विमान गुवाहाटीहून दुपारी 4:40 वाजता निघाले होते आणि चेन्नईला रात्री 7:45 च्या सुमारास उतरणे अपेक्षित होते. मात्र, चेन्नई विमानतळावरील गर्दी आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) कडून उशिरा मंजुरी मिळाल्याने पायलटला लँडिंग रद्द करावी लागली. विमानाला ‘गो-अराऊंड’ करत होल्डिंग पॅटर्नमध्ये जास्त वेळ थांबावे लागले, ज्यामुळे इंधनाचा वापर अपेक्षेपेक्षा जास्त झाला.

बेंगळुरूपासून सुमारे काही अंतरावर असताना पायलटने ATC ला आपत्कालीन परिस्थितीची माहिती दिली आणि बेंगळुरूत लँडिंगची परवानगी मागितली. रिपोर्टनुसार, चेन्नईत दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न न करता पायलटने बेंगळुरूकडे विमान वळवले, जिथे ते सुरक्षितपणे उतरले.

प्राथमिक तपासात असे दिसून आले की, चेन्नईतील लँडिंगचा प्रयत्न ‘अस्थिर’ होता, ज्यामुळे तो रद्द करावा लागला. या एअरबस A321 विमानाच्या दोन्ही पायलटला चौकशी पूर्ण होईपर्यंत काम थांबवण्यास सांगण्यात आले आहे. इंडिगोने याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.

‘मेडे’ कॉल म्हणजे काय?

‘मेडे’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरला जाणारा आपत्कालीन संकेत आहे, जो विमान किंवा जहाजावर गंभीर संकट असताना वापरला जातो. फ्रेंच शब्द ‘m’aidez’ (मला मदत करा) वरून आलेला हा शब्द तीन वेळा उच्चारला जातो: “मेडे, मेडे, मेडे”. इंजिन निकामी होणे, आग लागणे किंवा गंभीर वैद्यकीय गरज यासारख्या परिस्थितीत हा कॉल वापरला जातो. ‘मेडे’चा गैरवापर हा दंडनीय गुन्हा आहे.

यापूर्वी 12 जून 2025 रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघातावेळीही ‘मेडे’ कॉलचा वापर झाला होता. विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसाहतीवर कोसळण्यापूर्वी पायलटने मेडे कॉल दिला होता.