इटलीच्या ‘प्राडा’ची अखेर कबुली’फॅशन शो’तील चप्पल कोल्हापुरीच

Prada finally acknowledges Kolhapuri chappal inspiration

कोल्हापूर- इटली (Italy) देशातील ‘प्राडा'(Prada) कंपनीने एका फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चपलेची (Kolhapuri Chappal) हूबेहूब नक्कल सादर केली होती. विशेष म्हणजे या चप्पलला स्वतःचा ब्रँड वापरुन ही चप्पल इटालियन असल्याचे भासवले होते. मात्र यावर आक्षेप घेत महाराष्ट्र चेंबर ऑफ काँमर्स इंडस्ट्री अँड अँग्रीकल्चरने (Maharashtra Chamber of Commerce Industries and Agriculture) या कंपनीला कोल्हापुरी हिसका दाखवला. त्यानंतर लगेच ‘प्राडा’ कंपनीने आपण कोल्हापुरी चपलेचीच डिझाईन असल्याची लेखी कबुली दिली.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले की, महाराष्ट्र चेंबरने या प्रकारावर जोरदार आक्षेप घेत इटली येथील ‘प्राडा’चे संचालक पेट्रिझो बर्टेली यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर लगेच पेट्रिझो बर्टेली यांनी पत्राचे उत्तर पाठवले. त्यात त्यांनी आपल्या कंपनीने ‘कोल्हापुरी चप्पल’ ची डिझाईन उपयोगात आणल्याची कबुली दिली आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की, आम्ही फक्त आमच्या वस्तू प्रदर्शनात मांडल्या आहेत. यातील कोणतीही वस्तू अद्याप उत्पादनासाठी किंवा विक्रीसाठी निश्चित केलेली नाही. फॅशन शोमध्ये दाखवलेली चप्पल शतकानुशतके जुना वारसा असलेल्या पारंपारिक भारतीय हस्तकला पादत्राणे आहेत. जबाबदार डिझाइन पद्धती, सांस्कृतिक सहभाग वाढवणे आणि स्थानिक भारतीय कारागीर समुदायांशी अर्थपूर्ण देवाणघेवाणीसाठी संवाद सुरू करण्यास आम्ही वचनबद्ध आहोत.