ठाकरे बंधूंच्या मोर्चाला शरद पवारांचे समर्थन! मोर्चात सहभागी होणार! काँग्रेस नेहमीप्रमाणे संभ्रमात

मुंबई -हिंदी सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे 5 जुलै रोजी काढणार असलेल्या एकत्र मोर्चाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, हिंदी सक्तीच्या विरोधात होणार्‍या मोर्चात आम्ही पूर्ण ताकदीने सहभागी होऊ. काँग्रेसने मात्र नेहमीप्रमाणे अजून मोर्चात सहभागी होण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यांची सततची संभ्रमाची अवस्था कायम आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाषा शिक्षण हा केवळ राजकीय विषय नाही, तर अत्यंत महत्त्वाचा सामाजिक व शैक्षणिक विषय आहे. भाषेचा मुद्दा अत्यंत गांभीर्याने घेतला पाहिजे. भाषेसंदर्भात जाणकार आणि तज्ज्ञांचे मत, माहिती आणि विचार जाणून घेणे आवश्यक आहे. हा विषय केवळ राजकारण म्हणून हाताळणे योग्य नाही. मी पुन्हा सांगते की, शिक्षण हा विषय खूप गंभीर आहे. हा त्यांचे सरकार की आमचे सरकार असा प्रश्न नाही. शिक्षणासंदर्भातील निर्णय तज्ज्ञांनी आणि पालकांनी मिळून घ्यायला हवा. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. जनतेच्या भावना नेहमी ऐकून घेणे हीच लोकप्रतिनिधींची खरी ताकद असते. कोणी एकत्र येण्याची भावना व्यक्त केली तर आम्ही ती ऐकून घेतली आहे. कोणताही निर्णय अंतिम नसतो. अनेक वेळा चर्चा होते, देवाणघेवाण होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिंदी सक्तीविरोधात निघणार्‍या मोर्चामध्ये पूर्ण ताकदीने सहभागी होणार आहे. आमच्या पक्षाकडून मराठीसाठी मोर्चात कोण सहभागी होईल, हे आज-उद्या निश्चित होईल.

आमदार जयंत पाटील यांनीही आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना व पदाधिकार्‍यांना मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. या मोर्चाच्या निमित्ताने आज ठाण्यामध्ये शरद पवार गटाची बॅनरबाजीही पाहायला मिळाली. शरद पवार गटाचे ठाणे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी कळवा नाका, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, स्टेशन रोड आदी परिसरात बॅनर लावले आहेत. या बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांचे छायाचित्र आहे. त्यावर चला मुंबई, मराठी अस्मिता जागृत करूया. ठाकरेंच्या नेतृत्वात मोर्चात सामील होऊया! मराठी भाषेच्या अभिमानासाठी ठाकरेंचा मोर्चा, राष्ट्रवादीचा पाठिंबा! शरद पवारसाहेबांच्या विचाराचा मान! जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादी मैदानात! एक श्वास मराठीचा ध्यास! मराठीसाठी आम्ही एकत्र आलोय आता आवाज उठवायचा असा मजकूर आहे.
या मोर्चासाठी काल मनसेचे बाळा नांदगावकर यांनी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनाही फोन केला होता. त्यावेळी वडेट्टीवार यांनीही काँग्रेस या मोर्चात सहभागी होण्याबाबत सकारात्मक आहे, असे सांगितले आहे. तर आम्ही या आंदोलनात सहभागी होणार नाही, असे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान, 5 जुलैला होणार्‍या मराठी भाषेच्या मोर्चासाठी मनसेकडून जनजागृती मोहीम सुरू करण्यात आले. आज दादर स्थानक परिसरात तसेच रेल्वेत मनसे नेते संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांनी हिंदी सक्तीविरोधात पत्रके वाटली. मुंबईतील शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणीही नागरिकांना पत्रके देत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. संदीप देशपांडे म्हणाले की, मराठीसाठी आमचा हा लढा आहे. आमची भूमिका हिंदी सक्तीविरोधात आहे. मोर्चाच्या दृष्टीने जर गरज पडली तर इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊ. सर्वांनी आंदोलनात उतरावे आणि निषेध व्यक्त करावा, असे माझे आवाहन आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा.

हिंदी येत नाही! मराठीतच बोलेन
मंत्री अशोक उईकेंचे विधान

राज्यात हिंदी सक्तीवरून वाद सुरू असतानाच भाजपा नेते आणि आदिवासी विकास मंत्री अशोक उईके मला हिंदी येत नाही. मी मराठीतच बोलणार, असे ठाम विधान केल्याने राजकीय वर्तुळात त्यांची चर्चा होत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज आदिवासी विभागाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर अशोक उईके यांनी त्यांनी हिंदीच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली की, माझा जन्म आदिवासी कुटुंबात झाला. माझी आई निरक्षर होती. तिने माझ्यावर मराठीचे संस्कार केले. त्यामुळे मला तीच भाषा येते. मला हिंदी येत नाही. त्यामुळे मी हिंदी माध्यमांशी हिंदीत बोलणार नाही.

Share:

More Posts