Eric Trump | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा मुलगा एरिक यांनी भविष्यात स्वतः किंवा ट्रम्प कुटुंबातील कोणीतरी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता असल्याचे संकेत दिले आहेत.
ट्रम्प ऑर्गनायझेशनचे कार्यकारी असलेल्या 41 वर्षीय एरिक (Eric Trump) यांनी एका मुलाखतीत सांगितले की, राजकारणाचा मार्ग त्यांच्यासाठी सोपा आहे, पण कुटुंबाला राजकीय जीवनाच्या तणावात आणायचे की नाही, याचा विचार करावा लागेल. या विधानाने ट्रम्प कुटुंबाचे अमेरिकन राजकारणातील वर्चस्व कायम राहण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
एरिक म्हणाले, “खरा प्रश्न हा आहे की, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांना यात ओढायचे आहे का? गेल्या दहा वर्षांत मी जो अनुभव घेतला, तो माझ्या मुलांना जगण्याची संधी द्यायची आहे का?” “जर याचे उत्तर ‘होय’ असेल, तर मला वाटते की मी हे करू शकेन आणि मला वाटते की माझ्या कुटुंबातील इतर सदस्यही हे करू शकतील.”, असे ते म्हणाले. त्यामुळे ट्रम्प यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत डोनाल्ड जूनियर (Donald Jr.) आणि इव्हांका ट्रम्प (Ivanka Trump) ज्यांनी सक्रिय राजकीय भूमिका घेतल्या आहेत. तर एरिक यांनी मात्र पडद्यामागे राहून ट्रम्प कुटुंबाच्या व्यावसायिकबाबींवर लक्ष केंद्रित केले आहे.
एरिक यांनी सध्याच्या राजकीय वर्गावर नाराजी व्यक्त करत म्हटले, “मी आणि माझे कुटुंबीय हे काम अधिक चांगल्या रीतीने करू शकतो.”, असेही ते म्हणाले.
ट्रम्प कुटुंबाने राजकारणातून नफा कमावला नसल्याचा दावा एरिक यांनी केला. त्यांनी सांगितले की, कायदेशीर लढाईत कुटुंबाने सुमारे 500 दशलक्ष डॉलर्स खर्च केले. तरीही, डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती वाढली आहे, ज्यात ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपमधील 2 अब्ज डॉलर्सचा हिस्सा आणि गेल्या वर्षी क्रिप्टो, रिअल इस्टेट आणि व्यापारी मालातून 630 दशलक्ष डॉलर्सची कमाई समाविष्ट आहे. ट्रम्प ऑर्गनायझेशनची किंमत 8 ते 12 अब्ज डॉलर्स असल्याचा त्यांचा अंदाज आहे.