‘ब्रह्मोस पाकिस्तानला मोफत मिळेल’, भारतीय अधिकाऱ्याने पाक जनरलला दिलेल्या सणसणीत उत्तराची जोरदार चर्चा

BrahMos Missile

BrahMos Missile | भारत आणि रशियाच्या संयुक्त विद्यमाने विकसित केलेले ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र (BrahMos Supersonic Cruise Missile) पुन्हा एकदा चर्चेत आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान या क्षेपणास्त्रांनी प्रमुख भूमिका बजावली होती. याच ब्रह्मोस क्षेपणास्त्राला पाकिस्तानाला विकणार का? असा प्रश्न एका पाकिस्तानी जनरलने भारतीय अधिकाऱ्याला केला होता.

अबू धाबी येथील एका आंतरराष्ट्रीय शस्त्रास्त्र प्रदर्शनात पाकिस्तानी जनरलने ब्रह्मोस एरोस्पेसचे माजी सीईओ डॉ. ए. शिवथाणू पिल्लई यांना विचारले होते की, “भारत आपले ब्रह्मोस क्षेपणास्त्र पाकिस्तानला विकेल का?” यावर डॉ. पिल्लई यांनी थेट आणि ठाम उत्तर दिले, “पाकिस्तानला ते फुकटात मिळेल.” त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये ब्रह्मोसच्या यशस्वी वापराचा संदर्भ देत हे विधान केले. काही वर्षांपूर्वीच्या चर्चेचा खुलासा नुकताच पिल्लई यांनी एका टीव्ही चॅनेलशी बोलताना केला.

10 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या प्रमुख हवाई तळांवर प्रत्युत्तर म्हणून ब्रह्मोस क्षेपणास्त्रांचा वापर केला. या हल्ल्यांमध्ये बंकर्स, हँगर्स आणि धावपट्ट्यांचे जवळपास एक मीटर अचूकतेने नुकसान झाले. एका मुलाखतीत डॉ. पिल्लई म्हणाले, “ऑपरेशन सिंदूर हा आमच्यासाठी अविस्मरणीय दिवस आहे. 15 पेक्षा जास्त क्षेपणास्त्रांनी दहशतवादी तळ नष्ट केले आणि पाकिस्तानला शरणागतीसाठी भाग पाडले.”

अबू धाबीतील शस्त्रास्त्र प्रदर्शनात पाकिस्तानी जनरलने विचारले, “तुम्ही इतके चांगले क्षेपणास्त्र का विकू इच्छिता?” यावर पिल्लई यांनी उत्तर दिले, “चांगला प्रोडक्ट विकलाच पाहिजे.” जेव्हा जनरलने पुन्हा विचारले, “पाकिस्तानला विकाल का?” तेव्हा पिल्लई यांनी पाकिस्तानला ते ‘फुकटात’ मिळाले, असे उत्तर दिले होते. आता ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये या क्षेपणास्त्राद्वारे भारताने पाकिस्तानी सैन्यात धडकी भरवली होती.

ब्रह्मोस हे जमीन, समुद्र, हवा आणि पाणबुडीवरून डागता येणारे क्षेपणास्त्र आहे, आणि आता त्याचे उत्पादन पूर्णपणे भारतातच होते.

डॉ. पिल्लई यांनी ब्रह्मोसच्या यशाचे श्रेय माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना दिले. 1991 मध्ये डॉ. कलाम यांच्या प्रेरणेतून पिल्लई यांनी हार्वर्ड येथे गल्फ वॉरमधील अमेरिकेच्या ‘टोमाहॉक’ क्रूझ क्षेपणास्त्राचा अभ्यास केला. त्यांना समजले की, शत्रूला निष्प्रभ करण्यासाठी सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची गरज आहे. कलाम यांच्या सल्ल्याने त्यांनी रशियासोबत सहकार्य केले आणि जगातील एकमेव सुपरसॉनिक इंजिनवर आधारित ‘ब्रह्मोस’ विकसित केले.