‘दोन्ही इंजिन बंद होणे दुर्मिळ’, एअर इंडिया विमान दुर्घटनेचा ‘घातपाताच्या’ दिशेनेही तपास सुरू, मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Air India Plane Crash

Air India Plane Crash | अहमदाबाद येथे गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे. या अपघातात 274 जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, ‘एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’ (AAIB) या प्रकरणाचा तपास सर्व बाजूंनी तपास करत आहे. घातपाताच्या (Sabotage) शक्यतेचाही तपास केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ मिळाला असून, त्याची तपासणी भारतातच केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

12 जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे बोईंग ड्रीमलाइनर 787-8 (Boeing Dreamliner 787-8) अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणानंतर काही क्षणांतच कोसळले होते. बी.जे. मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या निवासी वसाहतीवर विमान कोसळले आणि त्याला आग लागली. या अपघातात विमानातील 242 प्रवासी आणि क्रू मेंबर्सपैकी फक्त एक जण वाचला, तर जमिनीवर नऊ विद्यार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांचा मृत्यू झाला.

याबाबत NDTV शी बोलताना मोहोळ म्हणाले, “हा एक दुर्दैवी अपघात होता. AAIB ने चौकशी सुरू केली असून, घातपातासह सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांचे विश्लेषण सुरू आहे.” त्यांनी हेही नमूद केले की, वैमानिकाने उड्डाणानंतर लगेचच ‘मेडे’ (Mayday) कॉलद्वारे आपत्कालीन परिस्थिती कळवली होती.

मोहोळ यांनी या अपघाताला ‘दुर्मिळ’ म्हटले आहे. “विमानाच्या दोन्ही इंजिनांचे एकाच वेळी बंद पडणे ही याआधी कधीही न घडलेली घटना आहे,” असे ते म्हणाले. तज्ज्ञांनी ‘दुहेरी इंजिन फेल्युअर’चा दावा केला आहे. “ब्लॅक बॉक्समधील कॉक्पीट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) मधून वैमानिकांचे संभाषण आणि विमानाची माहिती मिळेल. येत्या तीन महिन्यांत चौकशी अहवाल स्पष्ट होईल,” असे मोहोळ यांनी सांगितले.

‘ब्लॅक बॉक्स’ तपासणीसाठी परदेशात पाठवण्याच्या वृत्ताला मोहोळ यांनी फेटाळून लावले. “ब्लॅक बॉक्स AAIB च्या ताब्यात आहे आणि त्याची तपासणी भारतातच होईल. यासाठी परदेशात पाठवण्याची गरज नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. ब्लॅक बॉक्समधील माहिती अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

प्रवाशांमधील भीती दूर करण्याचे प्रयत्न

या अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली होती. याबाबत मोहोळ म्हणाले, “DGCA च्या आदेशानुसार सर्व 33 बोईंग ड्रीमलाइनर्सची तपासणी पूर्ण झाली असून, सर्व विमाने सुरक्षित आढळली आहेत. हा अपघात दुर्मिळ होता, आणि आता प्रवासी निश्चिंतपणे प्रवास करत आहेत.”