Sunetra Pawar Deputy Chief Minister: आज सायंकाळी 5 वाजता दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मुंंबईतील लोकभवनमध्ये आयोजित साध्या समारंभात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घटनेने दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री लाभली आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांचे मिलन रद्द झाले. त्यामुळे शरद पवारांना धोबीपछाड मिळाला. आजच्या समारंभावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे हजर नव्हते. शरद पवार बारामतीतच थांबले आणि सुप्रिया सुळे संसद अधिवेशनासाठी पुण्याहून दिल्लीला रवाना झाल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार शपथविधीनंतर पुढील दहा दिवस बारामतीतच थांबणार असल्याचे सांगण्यात येते. शपथविधीनंतर ‘अजितदादा अमर रहे’च्या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येतील अशी चर्चा होती. ही अजित पवार यांची अखेरची इच्छा होती, असे शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यापासून अनेक नेते प्रथमच विशेष मुलाखती देऊन सांगू लागले होते. मात्र तोपर्यंत अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांनी वेगवान पावले टाकत सुनेत्रा पवार यांचे नाव उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचा गट नेता यासाठी कायम केले. सुनेत्रा पवार या रात्रीच पार्थ व जय पवार यांना घेऊन मुंबईला पोहोचल्या. आज सकाळी राष्ट्रवादी विधिमंडळाची बैठक सकाळी 11 वाजता जाहीर झाली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांचे नाव अधिकृतपणे उपमुख्यमंत्रिपदासाठी निश्चित होणार होते.
मात्र त्याआधी बारामतीत शरद पवार यांनी खेळी केली. त्यांनी सकाळी 8 वाजता पत्रकार परिषदेत सांगितले की, दोन्ही गटांचे मिलन व्हावे ही अजित पवारांची इच्छा होती. हा निर्णय अंतिम झाला होता. मात्र आता या चर्चेला खंड पडला आहे. सुनेत्रा पवार यांची निवड व शपथविधी याबाबत मला काहीही माहीत नाही हेही शब्द पवार म्हणाले. शपथविधी व निवड इतक्या घाईने का होत आहे कळत नाही हे वाक्यही शरद पवारांनी उच्चारले आणि खळबळ माजली.
अजित पवारांच्या निधनानंतर तीनच दिवसांनी असा शपथविधी होणे अनेकांना रुचले नव्हते. शरद पवारांच्या विधानाने ही भावना तीव्र झाली. यामुळे जनभावना शांत करण्यासाठी पार्थ पवार हे मुंबईहून घाईने बारामतीला परतले. त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला, पण शरद पवार शपथविधीला आले नाहीत. दिल्लीला संसदेत हजर राहण्यासाठी सुप्रिया सुळे निघाल्या तेव्हा त्यांना शपथविधीला हजर राहणार का, असे विचारले असता मला त्याबाबत काहीही माहिती नाही असे त्या म्हणाल्या. यामुळे पवार कुुटुंबातील वितुष्ट अगदीच उघड झाले. पार्थ पवार बारामतीला गेल्याने ते शपथविधीला उपस्थित राहू शकले नाहीत. जय पवार हेच उपस्थित होते. येत्या काळात सुनेत्रा पवार या खासदारकी सोडतील. ती जागा पुत्र पार्थ पवार घेईल. त्यानंतर सुनेत्रा पवार विधान परिषदेवर जातील किंवा अजित पवार यांच्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतील. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. सध्या वादळापूर्वीची शांतता आहे. राष्ट्रवादीचे नेते किती काळ एकत्र राहतील. भाजपा खेळी खेळेल, शरद पवार निवृत्त होतील का, हे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत. महाराष्ट्राचे राजकारण इथून पुढे अधिक गढूळ होईल हे निश्चित आहे.
पंतप्रधान मोदींच्या शुभेच्छा
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर काही क्षणातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीत एक्स पोस्ट करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिले की, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू करणार्या सुनेत्रा पवार यांना शुभेच्छा. मला विश्वास आहे की, त्या राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी अथक परिश्रम करतील आणि दिवंगत अजितदादा पवार यांचे स्वप्न पुढे नेतील.
सुनेत्रा पवारांना
अर्थ खाते नाही
शपथविधी झाल्यानंतर काही तासांतच सुनेत्रा पवार यांची खाती जाहीर करण्यात आली. अजित पवार यांच्याकडे असलेले क्रीडा, अल्पसंख्याक, औकाफ आणि उत्पादन शुल्क ही खाती सुनेत्रा पवार यांना देण्यात आली. मात्र महत्त्वाचे अर्थ खाते त्यांना देण्यात आलेले नाही. हे खाते कुणाकडे जाणार याबाबत उत्सुकता आहे.
सुनेत्रा अजित पवार
जन्म – तेर (धाराशिव)
18 ऑक्टोबर 1963
शिक्षण – मराठवाडा विद्यापीठातून बीकॉम
व्यवसाय- उद्योग व कृषी
संपत्ती – 127 कोटी रुपये
वाहने – ट्रेलर -6, ट्रॅक्टर 1, होंडा, टोयोटा
वडील – बाजीराव पाटील
आई – द्रौपदी पाटील
भाऊ – लोकसभा खा, पद्मसिंह पाटील
एनजीओ – एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या एनजीओची 2010 साली स्थापना
आवड – चित्रकला. नेहरू आर्ट सेंटर येथे चित्रकलेचे प्रदर्शन भरले आहे.
गेले सात महिने अजित पवार आणि मी
चर्चा करून एकत्र येण्याचा निर्णय घेतला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणावरून उलटसुलट दावे केले जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मोठे वक्तव्य केले. ते म्हणाले की, गेले सात महिने अजित पवार आणि माझ्यात यावरून सातत्याने चर्चा सुरू होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र आणण्याचा निर्णय झाला होता. अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या दिवशीही यासंदर्भात मी भाष्य केले होते. अलीकडच्या काळात अजित पवार अनेक वेळा माझ्या घरी आले होते. या भेटींमध्ये सविस्तर चर्चा झाली असून, चार वेळा ते जेवण करून चर्चा पूर्ण करून गेले होते. शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याची तीव्र इच्छा अजित पवार यांनी व्यक्त केली होती. जनमानसात निर्माण झालेला समज दूर करून पुन्हा शरद पवार यांच्या नेतृत्वात यायचे असल्याचे ते सांगत होते. या संदर्भात जवळपास आठ ते दहा वेळा बैठका झाल्या होत्या. सुरुवातीच्या दोन-चार बैठकीतच अजित पवार यांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या होत्या. शरद पवार यांच्याबद्दल त्यांना प्रचंड आदर होता. मागील दोन-अडीच वर्षांत घडलेल्या घडामोडी विसरून महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध करण्याचा त्यांचा आग्रह होता.
खा. अमोल कोल्हे आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही अजित पवार यांची बैठक झाली होती. 16 जानेवारी रोजी अजित पवार आणि पक्षातील काही प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली होती. त्या बैठकीत जिल्हा परिषद निवडणुका आघाडीत लढवण्याचा निर्णय झाला होता. 7 फेब्रुवारीला निकाल लागल्यानंतर 8 फेब्रुवारी रोजी याबाबत घोषणा करण्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यादिवशी माझा दिल्ली दौरा असल्याने 12 तारीख ठरली. ते पुढे म्हणाले की, त्यादिवशी आम्ही त्यांना गमतीत म्हटले की, शरद पवार यांना भेटायला बारामतीला जाऊ. तेव्हा ते म्हणाले होते की, ती धावपट्टी लहान आहे त्याठिकाणी माझे विमान उतरणार नाही. त्यानंतर आम्ही पहाटे गाडीने बारामतीला गेलो. तेथे 8 वाजताच्या सुमारास सविस्तर चर्चा झाली आणि सर्वांनी 12 फेब्रुवारी तारीख निश्चित केली. या चर्चेचे अनेक तपशील आहेत. मात्र प्रामुख्याने दोन्ही पक्ष एकत्र करण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह इतर नेत्यांना याबाबत कल्पना दिली आहे. त्यांचे मत होते की, त्यांचा निर्णय पक्षात अंतिम असतो. त्यामुळे त्याबाबत चिंता करण्याची आवश्यकता नाही.
पाटील असावा, पण पटेल नाही
राज ठाकरेंची खोचक पोस्ट
राज्याच्या राजकारणात घडामोडी वेगाने सुरू असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक्सवर खोचक पोस्ट करत लक्ष वेधले. त्यांच्या पोस्टमधील पाटील असावा, पण पटेल नाही, या वाक्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाबाबत सुरू असलेल्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी म्हटले की, महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे. त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत, त्यावर बोलावंच लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा, पण पटेल नाही.
—————————————————————————————————————————–
हे देखील वाचा –













