PM Modi Reference in Jeffrey Epstein Files: अमेरिकेचा अर्थतज्ज्ञ आणि लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टाईनशी संबंधित प्रकरणातील नवीन कागदपत्रे अमेरिकेच्या न्याय विभागाने सार्वजनिक केली आहेत. या कागदपत्रांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा संदर्भ आल्याने भारताने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने हे सर्व दावे पूर्णपणे फेटाळून लावत, एका गुन्हेगाराने केलेली ही विधाने केवळ ‘कचरा’ असून ती तिरस्काराने फेटाळून लावण्यायोग्य आहेत, असे म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
अमेरिकेतील ‘एपस्टाईन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट’ अंतर्गत सुमारे 30 लाख पानांची कागदपत्रे, 2,000 व्हिडिओ आणि 1,80,000 फोटो सार्वजनिक करण्यात आले आहेत. यातील एका ईमेल संदेशामध्ये पंतप्रधान मोदींच्या 2017 मधील इस्रायल दौऱ्याचा उल्लेख आढळला आहे.
जेफ्री एपस्टाईन हा श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्तींशी संबंध ठेवून तरुण मुलींच्या लैंगिक शोषणाचे रॅकेट चालवत होता. ऑगस्ट 2019 मध्ये तुरुंगातच त्याचा मृत्यू झाला होता.
भारताचे सडेतोड उत्तर
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, “पंतप्रधान मोदी यांनी जुलै 2017 मध्ये इस्रायलचा अधिकृत दौरा केला होता, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, त्या ईमेलमधील इतर सर्व संदर्भ हे एका गुन्हेगाराचे वैयक्तिक आणि तथ्यहीन विचार आहेत. अशा प्रकारच्या कुप्रचाराला आम्ही कस्पटासमान मानतो आणि तो फेटाळून लावतो.”
इस्रायल दौऱ्याचे महत्त्व
पंतप्रधान मोदींचा जुलै 2017 मधील इस्रायल दौरा हा ऐतिहासिक होता. 1992 मध्ये भारत आणि इस्रायलमध्ये राजनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर इस्रायलला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले होते. याच दौऱ्याचा उल्लेख या वादग्रस्त फाइल्समध्ये करण्यात आला आहे, ज्याला भारताने कडाडून विरोध केला आहे.
कागदपत्रे प्रसिद्ध होण्याचे कारण
अमेरिकेत जेफ्री एपस्टाईन आणि त्याची सहकारी घिसलेन मॅक्सवेल यांच्या कृत्यांबद्दल सरकारला काय माहिती होती, हे उघड करण्यासाठी राजकीय आणि सामाजिक दबाव वाढला होता. त्यानंतर हा पारदर्शकता कायदा करण्यात आला. डेप्युटी अटर्नी जनरल टोड ब्लँचे यांनी सांगितले की, या कागदपत्रांमध्ये अशी माहिती आहे जी सुरुवातीला डिसेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आली नव्हती.











