Union Budget 2026 Big Announcements: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा ‘विकसित भारत’ या उद्दिष्टाकडे नेणारा पाया मानला जात आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि तरुणांच्या कौशल्यावर मोठा खर्च करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पातील १० मोठ्या घोषणा:
१. ७ नवीन हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर: देशातील प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी सरकारने ७ नवीन मार्गांवर हाय-स्पीड रेल्वे चालवण्याची घोषणा केली आहे. यात मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद आणि दिल्ली-वाराणसी यांसारख्या प्रमुख शहरांचा समावेश आहे.
२. शेतकऱ्यांसाठी ‘भारत-विस्तार’ एआय प्लॅटफॉर्म: शेतकऱ्यांना पीक सल्ला, हवामानाचा अंदाज आणि जोखीम व्यवस्थापन करण्यासाठी एआय आधारित बहुभाषिक प्लॅटफॉर्म सुरू केला जाईल. यामुळे आधुनिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळेल.
३. १ लाख नवीन आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती: आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी पुढील ५ वर्षात १ लाख ‘अलाईड हेल्थ प्रोफेशनल’ची भरती केली जाईल. तसेच १.५ लाख केअरगिव्हर्सना प्रशिक्षित केले जाणार आहे.
४. जिल्हा रुग्णालयांचा कायापालट: देशातील जिल्हा रुग्णालयांची क्षमता ५० टक्क्यांनी वाढवण्यासाठी नवीन आपत्कालीन आणि ट्रॉमा केअर केंद्रे उभारली जातील. याद्वारे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत होईल.
५. नारळ आणि मसाल्यांच्या पिकांसाठी विशेष पॅकेज: सुमारे १० दशलक्ष शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी जुन्या नारळ झाडांच्या जागी नवीन वाण लावले जातील. काजू आणि कोको पिकांसाठीही स्वतंत्र कार्यक्रम राबवले जातील.
६. महिला उद्योजकांसाठी ‘शी-मार्ट्स’: ‘लक्षाधीश दीदी’ योजनेच्या यशानंतर, ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायासाठी बाजारपेठ मिळावी म्हणून देशभर ‘शी-मार्ट्स’ (SHE-Marts) साखळी सुरू केली जाईल.
७. उच्च शिक्षणासाठी वसतिगृहांची निर्मिती: प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारली जातील. तसेच ५ नवीन विद्यापीठ टाऊनशिप्स विकसित करण्यात येतील.
८. लघु उद्योगांसाठी १०,००० कोटींचा निधी: लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आर्थिक पाठबळ देण्यासाठी ‘एसएमई ग्रोथ फंड’ सुरू केला जाईल. याशिवाय ७ लाख कोटी रुपयांची तरलता वाढवण्यासाठी विशेष तरतूद केली आहे.
९. ‘खेलो इंडिया मिशन’चा नवा टप्पा: क्रीडा क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नवीन मिशन राबवले जाईल. यात आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा आणि खेळाडूंच्या प्रशिक्षणावर १० वर्षांचा आराखडा तयार केला आहे.
१०. परदेश पर्यटन आणि शिक्षण स्वस्त: परदेशातील पर्यटन पॅकेजवर आकारला जाणारा स्रोत कर (TCS) ५ टक्क्यांवरून थेट २ टक्क्यांवर आणला आहे. यामुळे परदेशवारी आणि शिक्षण स्वस्त होणार आहे.













