Fadnavis on Ajit Pawar: महाराष्ट्र राजकारणात सध्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या कथित चर्चेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, अजित पवार यांच्याशी असलेल्या आपल्या घनिष्ठ संबंधांचा दाखला दिला आहे.
विलीनीकरणाची कोणतीही तारीख ठरली असती, तर त्याची माहिती अजितदादांनी आपल्याला निश्चितपणे दिली असती, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
मैत्रीपूर्ण संबंध आणि विश्वासाचे नाते
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अजित पवार हे केवळ सरकारमध्ये सहकारी नव्हते, तर त्यांच्याशी माझे वैयक्तिक संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. ते अनेक गोष्टी माझ्याशी मोकळेपणाने शेअर करायचे. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील आणि त्याची तारीखही निश्चित झाली असेल, तर अजितदादा ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवतील का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. किंबहुना, अशा मोठ्या निर्णयाची चर्चा त्यांनी भाजपसोबत केली असती, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
राजकारण करण्याची ही वेळ नाही
अजित पवार आणि शरद पवार यांच्यात विलीनीकरणाबाबत नेमके काय संभाषण झाले, याची आपल्याला अधिकृत माहिती नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. “सध्याची परिस्थिती अत्यंत दुःखद आहे आणि अशा वेळी या विषयावर राजकारण करणे मला योग्य वाटत नाही. मलाही अनेक गोष्टी ठाऊक आहेत, मी त्या सांगू शकतो; परंतु या क्षणी शांत राहणेच मी पसंत करतो,” असे भावनिक उद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.
सरकार स्थिर, निर्णयाचे स्वातंत्र्य पक्षाला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत निर्णयांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, दोन्ही राष्ट्रवादी हे स्वतंत्र पक्ष असून त्यांचे निर्णय घेण्यास ते सक्षम आहेत. त्यात भाजपचा कोणताही हस्तक्षेप नसतो. मात्र, अजितदादांचा पक्ष सत्तेत सहभागी आहे, त्यामुळे सरकारमधून बाहेर पडण्यासारखा किंवा विलीनीकरणासारखा कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी आमच्याशी संवाद साधला असता. अजितदादांच्या निधनाच्या आदल्या दिवशीच आम्ही जवळजवळ 1 तास गप्पा मारल्या होत्या, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली.











