EV Safety Tips: नुकताच सोशल मीडियावर महिंद्रा BE 6 या नवीन इलेक्ट्रिक गाडीला आग लागल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. यामुळे इलेक्ट्रिक वाहने (EV) वापरणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. मात्र, महिंद्रा कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले असून ही आग बॅटरीतील बिघाडामुळे नव्हे, तर चालकाच्या निष्काळजीपणामुळे लागल्याचे सिद्ध झाले आहे.
नेमकं काय घडलं?
गाडीच्या डेटा विश्लेषणातून समोर आले की, गाडीचा मागचा उजवा टायर पूर्णपणे निकामी (पंचर) झालेला असतानाही, चालक १० मिनिटांपर्यंत ताशी ६० किमी वेगाने गाडी चालवत होता. टायरमध्ये हवा नसल्याचे अलर्ट डॅशबोर्डवर वारंवार येत होते. टायरचा धातूचा भाग जमिनीला घासला गेल्यामुळे प्रचंड उष्णता निर्माण झाली आणि टायरच्या रबराला आग लागली. व्हिडिओमध्येही आगीची सुरुवात टायरपासून झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
तुमची इलेक्ट्रिक कार आगीपासून कशी वाचवाल? ५ महत्त्वाचे उपाय
१. बॅटरीची नियमित तपासणी करा: ईव्हीची बॅटरी हा तिचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बॅटरीमध्ये काही गळती आहे का, ती प्रमाणापेक्षा जास्त तापते का किंवा फुगली आहे का, याची तपासणी अधिकृत सर्व्हिस सेंटरवर वेळोवेळी करून घ्या. यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका टळतो.
२. प्रमाणित चार्जरचाच वापर करा: गाडी चार्ज करण्यासाठी नेहमी कंपनीने दिलेल्या किंवा प्रमाणित चार्जर आणि केबलचाच वापर करा. स्वस्त किंवा बनावट चार्जरमध्ये व्होल्टेज नियंत्रण नसते, ज्यामुळे ओव्हरहीटिंग होऊन आग लागण्याची शक्यता असते. चार्जिंगसाठी एक्स्टेंशन बोर्ड वापरणे टाळावे.
३. पार्किंग करताना घ्यायची काळजी: तुमची ईव्ही शक्यतो सावलीत किंवा हवेशीर ठिकाणी पार्क करा. कडक उन्हात जास्त वेळ गाडी उभी केल्याने बॅटरीवर दबाव येतो. तसेच गाडीजवळ ज्वालाग्राही पदार्थ नसल्याची खात्री करा.
४. सॉफ्टवेअर अपडेटकडे दुर्लक्ष करू नका: इलेक्ट्रिक गाड्यांचे नियंत्रण सॉफ्टवेअरद्वारे केले जाते. बॅटरी व्यवस्थापन आणि सुरक्षा प्रणाली सुधारण्यासाठी कंपन्या वेळोवेळी अपडेट्स देतात. हे अपडेट्स वेळेवर केल्यास तांत्रिक बिघाड वेळीच ओळखता येतात.
५. चेतावणी संकेतांकडे लक्ष द्या: डॅशबोर्डवर येणारे अलर्ट, गाडीतून येणारा विचित्र वास किंवा धूर यांकडे कधीही दुर्लक्ष करू नका. अशी कोणतीही गोष्ट आढळल्यास गाडी त्वरित सुरक्षित ठिकाणी उभी करा आणि प्रोफेशनल मेकॅनिकला बोलवा.











