CBSE Schools Holidays: महाराष्ट्र राज्यातील सीबीएसई शाळांच्या सुट्ट्यांबाबत वर्षानुवर्षे सुरू असलेला सावळा गोंधळ आता थांबणार आहे. राज्य सरकारने आता सर्व सीबीएसई शाळांना (अनुदानित, विनाअनुदानित, अल्पसंख्याक आणि महानगरपालिका शाळा) सरकारी नियमांनुसारच शैक्षणिक सुट्ट्या जाहीर करणे अनिवार्य केले आहे. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या सुट्ट्यांच्या वेळापत्रकाचे पालन करणे आता या शाळांसाठी बंधनकारक असेल.
एकरूपता आणण्यासाठी मोठे पाऊल
अनेक सीबीएसई शाळा स्थानिक प्रशासनाने जाहीर केलेल्या सुट्ट्या नाकारत होत्या किंवा सुट्ट्यांचे दिवस कमी करत होत्या. यामुळे एकाच परिसरातील वेगवेगळ्या शाळांच्या सुट्ट्यांमध्ये मोठी तफावत दिसून येत होती. पालकांच्या आणि शिक्षक संघटनांच्या तक्रारींनंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे उन्हाळी सुट्टी, दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांमध्ये आता सर्व शाळांमध्ये एकरूपता राहणार आहे.
नव्या नियमावलीतील महत्त्वाचे मुद्दे
- बंधनकारक वेळापत्रक: प्रत्येक जिल्ह्यासाठी मंजूर केलेले शैक्षणिक सुट्ट्यांचे वेळापत्रक त्या कार्यक्षेत्रातील सर्व सीबीएसई शाळांना लागू असेल.
- दिवाळी आणि नाताळ सुट्टी: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सरकारने दिवाळी आणि नाताळच्या सुट्ट्यांसाठी प्रत्येकी 10 दिवस निश्चित केले आहेत.
- स्वातंत्र्यावर मर्यादा: शाळांना त्यांच्या अंतर्गत नियोजनाचे स्वातंत्र्य असले, तरी राज्याने जाहीर केलेल्या अधिकृत सुट्ट्यांमध्ये बदल करण्याचा अधिकार नसेल.
शिक्षक आणि पालकांना मोठा दिलासा
‘सीबीएसई स्कूल स्टाफ वेलफेअर असोसिएशन’ने (SISWA) या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवला होता. अनेक शाळा व्यवस्थापन सरकारी आदेशांना केराची टोपली दाखवून स्वतःचे वेळापत्रक राबवत होते, ज्यामुळे शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या सुट्ट्या मिळत नव्हत्या. तसेच, ज्या पालकांची मुले वेगवेगळ्या बोर्डाच्या शाळांत शिकतात, त्यांचीही सुट्ट्यांच्या विसंगतीमुळे मोठी गैरसोय होत होती. आता या निर्णयामुळे सर्वांना दिलासा मिळाला आहे.
पारदर्शकता आणि शिस्त
केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर दिल्लीतही अशाच प्रकारे शैक्षणिक कॅलेंडरमध्ये शिस्त आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रातील शिक्षण अधिकाऱ्यांच्या मते, या निर्णयामुळे शाळांच्या मनमानी कारभाराला लगाम बसेल, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण होईल आणि शाळांच्या कामकाजात पारदर्शकता येईल.











