Home / महाराष्ट्र / Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रथमच महायुतीचा भगवा; रूपाराणी निकम महापौर तर अक्षय जरग उपमहापौरपदी विराजमान

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर महानगरपालिकेवर प्रथमच महायुतीचा भगवा; रूपाराणी निकम महापौर तर अक्षय जरग उपमहापौरपदी विराजमान

Kolhapur Municipal Corporation : करवीर नगरीच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची नोंद झाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या...

By: Team Navakal
Kolhapur Municipal Corporation
Social + WhatsApp CTA

Kolhapur Municipal Corporation : करवीर नगरीच्या राजकीय इतिहासात आज एका नव्या अध्यायाची नोंद झाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम यांची, तर उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची बहुमताने निवड करण्यात आली आहे. या विजयामुळे कोल्हापूर पालिकेच्या इतिहासात प्रथमच महायुतीने आपली सत्ता प्रस्थापित केली असून, सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पडले आहे.

जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज महापौरपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. या चुरशीच्या लढतीत भाजपच्या रूपाराणी निकम यांना ४६ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सचिन मारुती शेंडे यांना ३५ मतांवर समाधान मानावे लागले. बहुमताचा आकडा पार केल्यामुळे रूपाराणी निकम यांची महापौरपदी अधिकृत निवड घोषित करण्यात आली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीतही महायुतीचे वर्चस्व कायम राहिले. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय जरग यांनी काँग्रेसच्या दुर्वास कदम यांचा ४६ विरुद्ध ३५ अशा मताधिक्याने पराभव केला. या विजयानंतर कोल्हापूर शहरात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.

या सत्तास्थापनेपूर्वी महायुतीमध्ये महापौरपदावरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली होती. शिवसेना (शिंदे गट) या पदासाठी आग्रही होता आणि आमदार राजेश क्षीरसागर यांनी तशी बॅनरबाजीही केली होती. मात्र, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी चार दिवसांपूर्वीच रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा करून भाजपचा दावा निश्चित केला होता. प्रभाग क्रमांक १८ मधून काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव करणाऱ्या रूपाराणी निकम या उच्चशिक्षित असून महाडिक गटाच्या विश्वासू मानल्या जातात. त्यांचा महापौरपदाचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असणार आहे.

राजकीय समीकरणांचा विचार करता, या निवडणुकीत काँग्रेस हा ३४ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आले. आमदार सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले, परंतु मित्रपक्ष असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) ला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागल्याने सत्तेचे गणित बिघडले. दुसरीकडे भाजप (२६), शिवसेना शिंदे गट (१५), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (४) आणि जनसुराज्य (१) यांनी एकत्रित येत ४६ जागांचे संख्याबळ उभे केले, ज्यामुळे महायुतीचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत आपले खातेही उघडता आले नाही.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या