Rahul Narwekar Controversy: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि त्यांनी सभागृहात केलेल्या मराठी भाषेच्या चुकीच्या उच्चारांवरून प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ वकील असीम सरोदे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
नार्वेकरांच्या वाचनाचा खरपूस समाचार घेताना सरोदे यांनी सोशल मीडियावरून अत्यंत उपरोधिक शब्दांत टीका केली. “अध्यक्षांनी कितीही चुका केल्या तरी मी आता काही बोलणार नाही, नाहीतर माझी वकिलीची सनद पुन्हा रद्द केली जाईल,” असा खोचक टोला त्यांनी लगावला.
आपला उद्वेग व्यक्त करताना सरोदे पुढे म्हणाले की, राहुल नार्वेकर हे त्यांना हवे तेव्हा कोणाकडूनही काहीही लिहून घेऊ शकतात. ते कायदा, संविधान आणि भाषेचाही अपमान करतील, पण त्यांचे कोणी काही बिघडवू शकत नाही. इतके सगळे करूनही ते पुन्हा सभागृहात इतरांना शहाणपण शिकवण्यासाठी पुढे सरसावतात, अशा शब्दांत त्यांनी नार्वेकरांना धारेवर धरले.
दीनानाथ मंगेशकरांऐवजी ‘दीनदयाल’; शोकप्रस्तावातील मोठ्या चुका:
विधानसभेत नुकत्याच मांडण्यात आलेल्या शोकप्रस्तावाच्या वाचनादरम्यान राहुल नार्वेकर यांच्याकडून मराठी भाषेचा आणि नावांचा मोठा विपर्यास झाला. या चुकीच्या उच्चारांवरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही नार्वेकरांवर जोरदार टीका केली आहे. सभागृहात नक्की काय चुका झाल्या, त्याचे मुद्दे खालीलप्रमाणे:
- मंगेशकर यांच्या वडिलांचे नाव बदलले: प्रख्यात गायिका आशा भोसले यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडताना राहुल नार्वेकर यांनी ‘दीनानाथ मंगेशकर यांच्या कन्या’ असा उल्लेख करण्याऐवजी चक्क ‘दीनदयाल मंगेशकर यांच्या कन्या’ असे वाचन केले.
- शब्दांचे चुकीचे उच्चार: प्रस्तावातील मूळ शब्दांचा उच्चार करताना त्यांनी ‘आशा’ या शब्दाला ‘अशा’, ‘यथोचित’ शब्दाला ‘यशोचित’, ‘हृदय सिंहासनावर’ याऐवजी ‘हृदया सिंहासनावर’ आणि ‘दुर्दम्य’ या शब्दाचा उच्चार ‘दुर्दमय’ असा चुकीचा केला.
- गायिका सुमन कल्याणपूर यांच्या नावाचा विपर्यास: दुसऱ्या एका शोकप्रस्तावाची सुरुवात करताना त्यांनी ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या नावाचा उल्लेख ‘सुमन कल्याण पूर’ असा तोडून केला.
माफी मागण्यास दिला होता नकार; ३ महिन्यांसाठी सनद झाली होती रद्द
असीम सरोदे यांनी यापूर्वी न्यायव्यवस्था, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष यांच्यावर केलेल्या काही विधानांमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या वक्तव्यांमुळे न्यायालयांविषयी लोकांमध्ये अविश्वास निर्माण होत असल्याची लेखी तक्रार एका तक्रारदाराने बार कौन्सिलकडे केली होती. सरोदे यांचे वक्तव्य अशोभनीय आणि बदनामीकारक असल्याचे या तक्रारीत म्हटले होते.
तक्रारदाराने 19 मार्च 2024 रोजी सरोदे यांना लेखी माफी मागण्याची संधी दिली होती, पण त्यांनी ती नाकारली. माफी मागण्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे बार कौन्सिलने असीम सरोदे यांची वकिलीची सनद ३ महिन्यांसाठी रद्द केली होती. याच कारवाईचा संदर्भ देत सरोदे यांनी आता राहुल नार्वेकरांच्या मराठी उच्चारांवरून त्यांच्यावर नवीन शब्दांत निशाणा साधला आहे.
हे देखील वाचा – Lohagad Fort Murder Case: लोहगडवरून होणाऱ्या पतीला ढकलणाऱ्या तरुणीने ४ दिवसांपूर्वीच केला होता तसाच प्रयत्न; २,००४ कॉल्सने उघडले गुपित










