General Naravane Book Controversy : माजी लष्करप्रमुख जनरल (निवृत्त) एम. एम. नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ (Four Stars of Destiny) या आत्मचरित्रावरून सुरू असलेला वाद आता राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे. मंगळवारी हा वाद अधिक तीव्र झाला असून, स्वतः जनरल नरवणे यांनी या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रकाशक ‘पेंग्विन रँडम हाऊस इंडिया’चे अधिकृत स्पष्टीकरण सामायिक (Share) करत, हे पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नसल्याची भूमिका अधोरेखित केली आहे.
भाजपकडून ‘राष्ट्रीय माफी’ची मागणी-
या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. भाजप प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी राहुल गांधींच्या विधानांमधील विसंगतीवर बोट ठेवले. ते म्हणाले, “राहुल गांधी एकीकडे माजी लष्करप्रमुखांवर विश्वास असल्याचे सांगतात, मात्र आता खुद्द जनरल नरवणे यांनीच पुस्तक अप्रकाशित असल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे देशात मोठा संभ्रम निर्माण झाला असून, राहुल गांधी आता राष्ट्राची माफी मागणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
संसदेची दिशाभूल केल्याचा आरोप-
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधींनी संसदेत दाखवलेली पोस्ट ही केवळ ‘प्री-ऑर्डर’ संदर्भातील होती, असे स्पष्ट करत पूनावाला यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी विचारले की, “जर पुस्तक अद्याप प्रकाशितच झालेले नाही, तर त्याची प्रत राहुल गांधींकडे आली कोठून? हे ‘ऑफिशियल सिक्रेट्स अॅक्ट’ किंवा ‘कॉपीराइट’ कायद्याचे उल्लंघन नाही का? संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून त्यांनी संसदेची आणि जनतेची दिशाभूल केली आहे.”
दुसरीकडे, पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे. प्रकाशकांच्या मते, एखादे पुस्तक तेव्हाच प्रकाशित मानले जाते जेव्हा ते सर्व किरकोळ विक्री केंद्रांवर (Retail Channels) उपलब्ध होते. राहुल गांधींनी ज्या जुन्या पोस्टचा संदर्भ दिला होता, ती केवळ ‘प्री-ऑर्डर’ लिंक होती आणि ती दोन दिवसांतच मागे घेण्यात आली होती. सध्या हे पुस्तक कोणत्याही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाही. प्रकाशकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या पुस्तकाची कोणतीही छापील, डिजिटल किंवा पीडीएफ प्रत बाळगणे अथवा वितरित करणे हे कायदेशीर गुन्हा असून, अशा उल्लंघनकर्त्यांवर कडक कारवाई केली जाईल.
राहुल गांधी यांनी या पुस्तकाची प्रत दाखवल्यापासून या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी यावर आक्षेप घेतला असून, अप्रकाशित आणि संरक्षण मंत्रालयाची मंजुरी नसलेल्या साहित्याचा संदर्भ संसदेच्या पवित्र सभागृहात देणे हे संसदीय मयादेचे उल्लंघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणामुळे आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.










