Jio vs Airtel vs Vi: भारतात जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या तीनही प्रमुख टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किमतीचे अनेक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करतात. परंतु, ज्या ग्राहकांचे बजेट 200 रुपयांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी नेमका कोणता प्लॅन सर्वात फायदेशीर ठरेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. तुमचे पैसे योग्य ठिकाणी खर्च व्हावेत, यासाठी आम्ही २०० रुपयांच्या आत येणाऱ्या तिन्ही कंपन्यांच्या सर्वोत्तम प्रीपेड प्लॅन्सची सविस्तर तुलना घेऊन आलो आहोत.
या बजेटमध्ये तिन्ही कंपन्यांकडे अमर्याद कॉलिंग आणि इंटरनेट डेटा देणारा प्रत्येकी एक मुख्य प्लॅन उपलब्ध आहे. मात्र, तिन्हींचे फायदे आणि व्हॅलिडिटी पूर्णपणे वेगळी आहे.
Jio चा 198 रुपयांचा प्लॅन: डेटा युजर्ससाठी पर्वणी
रिलायन्स जिओकडे 200 रुपयांच्या आत 198 रुपयांचा एक शक्तिशाली प्लॅन आहे. जर तुम्हाला इंटरनेटचा वापर जास्त करायचा असेल, तर हा प्लॅन उत्तम आहे.
- डेटा आणि कॉलिंग: यामध्ये ग्राहकांना दररोज 2GB हाय-स्पीड इंटरनेट डेटा मिळतो. तसेच पात्र युजर्ससाठी ट्रूली अनलिमिटेड 5जी डेटा पूर्णपणे मोफत दिला जातो. याशिवाय कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस मिळतात.
- व्हॅलिडिटी आणि इतर फायदे: या प्लॅनची व्हॅलिडिटी 14 दिवसांची आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते.
Airtel चा 199 रुपयांचा प्लॅन: व्हॅलिडिटी आणि ओटीटीचा धमाका
भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी 199 रुपयांचा प्लॅन आणला आहे. ज्यांना कमी पैशात जास्त दिवस सिम सुरू ठेवायचे आहे, त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे.
- डेटा आणि कॉलिंग: या प्लॅनमध्ये ग्राहकांना संपूर्ण व्हॅलिडिटीसाठी एकूण 2GB डेटा मिळतो. सोबतच रोज 100 एसएमएस आणि सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड लोकल, एसटीडी व रोमिंग कॉल्सची सुविधा मिळते.
- व्हॅलिडिटी आणि इतर फायदे: हा प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह येतो. एअरटेल यामध्ये जबरदस्त अतिरिक्त फायदे देत आहे. ग्राहकांना अॅडोब एक्सप्रेस प्रीमियम, मोफत हॅलट्यून्स आणि एअरटेल एक्सस्ट्रीम प्लेचे सबस्क्रिप्शन मिळते, ज्याद्वारे सोनी लिव्ह, अॅमेझॉन एमएक्स प्लेअर यांसारख्या प्लॅटफॉर्मवरील कंटेंट मोफत पाहता येतो.
Vi चा 199 रुपयांचा प्लॅन: दीर्घ व्हॅलिडिटीचा स्वस्त पर्याय
व्होडाफोन-आयडियाचा 199 रुपयांचा प्लॅन एअरटेलला थेट टक्कर देतो, पण यात काही मर्यादा आहेत.
- डेटा आणि कॉलिंग: या प्लॅनमध्येही 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह संपूर्ण कालावधीसाठी एकूण 2GB इंटरनेट डेटा मिळतो. तसेच ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगचा आनंद घेता येतो.
- एसएमएस आणि इतर फायदे: एसएमएसच्या बाबतीत हा प्लॅन थोडा मागे पडतो, कारण यात संपूर्ण २८ दिवसांसाठी एकूण फक्त 300 एसएमएस मिळतात. अतिरिक्त फायदा म्हणून यात व्हीआय मुव्हीज आणि टीव्हीचा अॅक्सेस मिळतो.
अंतिम निकाल: तुमच्यासाठी कोणता प्लॅन आहे सर्वोत्तम?
२०० रुपयांच्या बजेटमध्ये कोणता प्लॅन निवडावा, हे पूर्णपणे तुमच्या गरजेवर अवलंबून आहे:
जर तुम्हाला रोज जास्त इंटरनेट हवे असेल आणि अवघ्या १४ दिवसांत पुन्हा रिचार्ज करण्याची तुमची तयारी असेल, तर जिओचा १८९ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे, कारण यात दररोज २GB डेटा आणि फ्री ५जी इंटरनेट मिळते.
परंतु, जर तुम्हाला कमी इंटरनेट चालते आणि जास्त दिवसांसाठी म्हणजेच महिनाभरासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएस हवे असतील, तर एअरटेलचा प्लॅन व्होडाफोन-आयडिया आणि जिओपेक्षा खूप जास्त सरस आहे. एअरटेलमध्ये रोज १०० एसएमएस मिळतात, तर व्हीआयमध्ये पूर्ण महिन्यात फक्त ३०० एसएमएसवर समाधान मानावे लागते. शिवाय एअरटेलमध्ये मिळणारे मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन हा या प्लॅनचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे.










