Maharashtra Board HSC exams 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या (HSC) परीक्षांच्या पहिल्याच दिवशी कॉपीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील एका परीक्षा केंद्रावर सामूहिक कॉपी झाल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी पोलीस प्रशासनाने पर्यवेक्षकांसह एकूण २३ जणांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवला आहे.
नेमकी घटना काय?
मंगळवारी बारावीच्या परीक्षेचा पहिला दिवस होता आणि इंग्रजी विषयाचा पेपर सुरू होता. जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात परीक्षा सुरू असताना काही संशयास्पद हालचाली निदर्शनास आल्या. देवगाव रंगारी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रावर तपासणी केली असता विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिकांमधून सर्रासपणे उत्तरे लिहून घेत असल्याचे (सामूहिक कॉपी) आढळून आले. केवळ प्रत्यक्ष पाहणीच नव्हे, तर केंद्रातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासल्यानंतर या गैरप्रकारावर शिक्कामोर्तब झाले.
पर्यवेक्षक आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई
या गंभीर प्रकरणाची दखल घेत शिक्षण मंडळाच्या भरारी पथकाने तातडीने चौकशी सुरू केली. धक्कादायक बाब म्हणजे, परीक्षेत पारदर्शकता राखण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, तेच जिल्हा परिषदेचे शिक्षक आणि परीक्षा केंद्रावरील अन्य कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. या पार्श्वभूमीवर, कर्तव्यात कसूर केल्याबद्दल आणि गैरप्रकाराला खतपाणी घातल्याबद्दल २३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शिक्षण विभागाने यातील दोषी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू केली असून, खासगी शाळांच्या कर्मचाऱ्यांवरही कठोर प्रशासकीय कारवाई केली जाणार आहे.
परीक्षा केंद्रावरील संपूर्ण कर्मचारी वर्ग बदलला
घटनेचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने जैतापूर केंद्रावरील संपूर्ण कर्मचारी वर्ग तात्काळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी नवीन पर्यवेक्षक आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी याप्रकरणी ‘महाराष्ट्र विद्यापीठ, मंडळ व इतर विहित परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, १९८२’ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
शिक्षण विभागाचा इशारा
राज्यात ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवले जात असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे शिक्षण क्षेत्रासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील अन्य परीक्षा केंद्रांवरील यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. परीक्षेच्या पावित्र्याला बाधा आणणाऱ्या कोणत्याही घटकाची गय केली जाणार नाही, असा इशारा शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.










