Raj Thackeray On Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या आणि पक्षांतराच्या गलिच्छ राजकारणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत कठोर आणि आक्रमक शब्दांत प्रहार केला. ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या जाहीर मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांच्या बदलत्या भूमिकांवर तीव्र आक्षेप घेतला.
पक्षांतराची तुलना थेट एका गंभीर सामाजिक विकृतीशी करताना राज ठाकरे म्हणाले, “सध्या प्रश्न विकत घेणाऱ्यांचा उरलेला नाही, तर स्वतःची विक्री करून घेणाऱ्यांचा आहे. जर कोणी स्वतःहून देहविक्रीला तयार असेल, तर त्याला बाजारात गिऱ्हाईक मिळणारच.”
उन्हातान्हात रांगेत उभे राहून मतदान करणाऱ्या सर्वसामान्य मतदारांच्या विश्वासाचा हा घोर अपमान असून, लोकशाहीत अशी फसवणूक थांबली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण राजकारणात काय करतोय आणि कोणत्या थराला जातोय, याला काही मर्यादा आहेत की नाही? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजपमध्येच नवे विरोधक जन्म घेणार; इतिहासाचा दाखला देत दिला सल्ला
बाहेरील विरोधी पक्ष संपवण्याच्या नादात सत्ताधारी भाजप स्वतःसाठीच नवी डोकेदुखी निर्माण करत असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. यासाठी त्यांनी आणीबाणीच्या काळातील इतिहासाचा संदर्भ दिला. “जगाचा इतिहास साक्षी आहे की, जेव्हा जेव्हा सत्ताधाऱ्यांनी समोरचा विरोधक पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्यांच्या स्वतःच्याच पक्षात नवे विरोधक आणि शत्रू जन्माला आले आहेत,” असे ठाकरे म्हणाले.
विरोधकांना संपवण्याची हीच घातक प्रक्रिया आता भाजपमध्ये अंतर्गत पातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे बाहेरचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपने स्वतःच्या घरात तयार होणाऱ्या बंडखोरांकडे आधी लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला त्यांनी दिला.
“भाजप म्हणजे पत्त्यांचा बंगला”; मोदींचा पत्ता सरकला की सर्व कोसळणार
सध्याच्या भाजपच्या बलाढ्य स्थितीवर भाष्य करताना राज ठाकरेंनी त्यांची तुलना पत्त्यांच्या बंगल्याशी केली. आज भाजपची जी काही मोठी रचना देशात दिसत आहे, ती केवळ आणि केवळ एकाच नेत्यावर उभी आहे.
ते म्हणाले, “भाजप हा पत्त्यांच्या बंगल्यासारखा आहे, ज्याचा सर्वात खालचा मुख्य पाया नरेंद्र मोदी आहेत. ज्या दिवशी तो पाया सरकेल, त्या दिवशी हा संपूर्ण बंगला पत्त्यांसारखा कोसळायला वेळ लागणार नाही.” याशिवाय, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार फुटल्यानंतर ते थेट भाजपमध्ये का गेले नाहीत? किंवा तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटल्यावर त्यांनी स्वतंत्र गट का स्थापन केला? या सगळ्या गोष्टी एका विशिष्ट राजकीय रणनीतीचा भाग आहेत, ज्याचे गंभीर परिणाम भविष्यात संपूर्ण देशाला भोगावे लागतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
सिमेंटचे जंगल म्हणजे विकास नव्हे; नियोजनाच्या अभावावर बोट
राजकीय घडामोडींसोबतच राज ठाकरेंनी शहरांच्या विस्कळीत विकासावर आणि प्रशासनावरही कडक शब्दांत ताशेरे ओढले. सध्याच्या विकास प्रारूपावर त्यांनी खालील आक्षेप नोंदवले:
मतदार यादीचा मुद्दा: मतदार यादीत दरवर्षी होणारे बदल आणि नवीन मतदारांची नाव नोंदणी ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती थांबवता येणार नाही. पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये या प्रक्रियेचा किती मोठा प्रभाव पडला आहे, हे सर्वांनी पाहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
केवळ पैसा आणि सत्ता: आजच्या काळात शहरांची रचना कशी असावी, ती राहण्यायोग्य कशी बनवावीत, याकडे कोणाचेच लक्ष राहिलेले नाही. केवळ बिल्डर्स, बांधकाम, पैसा आणि सत्ता एवढ्यापुरताच विकास मर्यादित झाला आहे.
समतोलाची गरज: फक्त नवीन रस्ते आणि उड्डाणपूल बांधले म्हणजे विकास होत नाही. शहरांची लोकसंख्या, वाढ आणि योग्य नियोजन यांचा समतोल राखणे गरजेचे आहे.
हे देखील वाचा – Maharashtra Politics: ‘ऑफर आली तर नक्कीच…’; अमोल कोल्हेंच्या विधानाने ऑपरेशन तुतारीची चर्चा










