Aadhaar App Address Update: आधार कार्डमधील पत्ता बदलण्यासाठी आता आधार केंद्रांवर फेऱ्या मारण्याची किंवा तासनतास रांगेत उभे राहण्याची कटकट संपली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (UIDAI) नागरिकांसाठी आधार ॲपद्वारे पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या मदतीने घरबसल्या हा बदल करू शकता.
कसा अपडेट कराल पत्ता? जाणून घ्या सोप्या स्टेप्स:
- ॲप लॉग-इन: सर्वात आधी नवीन आधार ॲप डाउनलोड करा. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक आणि नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून लॉग-इन करा. सुरक्षिततेसाठी बायोमेट्रिक किंवा एम-पिन सेट करा.
- अपडेट प्रक्रिया: ॲपमधील ‘सर्व्हिसेस’ विभागात जाऊन ‘ॲड्रेस अपडेट’ हा पर्याय निवडा. येथे तुम्ही स्वतःच्या कागदपत्रांच्या आधारे किंवा कुटुंबातील सदस्याच्या आधार कार्डचा संदर्भ देऊन पत्ता बदलू शकता.
- कागदपत्रे अपलोड करा: घराचा पत्ता सिद्ध करण्यासाठी वीज बिल, बँक स्टेटमेंट किंवा इतर वैध पुराव्याचा स्पष्ट फोटो किंवा स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल.
- शुल्क आणि सबमिट: या प्रक्रियेसाठी साधारण 75 रुपये शुल्क भरावे लागेल. अर्ज सबमिट केल्यानंतर काही दिवसांतच तुमच्या आधारवरील पत्ता बदलला जाईल.
नवीन आधार ॲपची वैशिष्ट्ये
वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांच्या हस्ते नुकतेच हे नवीन आधार ॲप लाँच करण्यात आले आहे. हे ॲप केवळ पत्ता बदलण्यासाठी नाही, तर इतर अनेक कामांसाठी उपयुक्त ठरणार आहे:
- फेस व्हेरिफिकेशन: उपस्थितीचा पुरावा म्हणून फेस ऑथेंटिकेशनची सुविधा.
- बायोमेट्रिक लॉक: एका क्लिकवर तुमचे बायोमेट्रिक्स लॉक किंवा अनलॉक करण्याची सोय.
- क्युआर कोड शेअरिंग: तुमची ओळख पटवण्यासाठी डिजिटल क्यूआर कोडचा वापर.
- ऑफलाइन पडताळणी: हॉटेल चेक-इन किंवा इतर ठिकाणी ऑफलाइन व्हेरिफिकेशनसाठी याचा वापर करता येईल.
डिजिटल इंडियाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असून, यामुळे सर्वसामान्यांचा वेळ आणि श्रम वाचणार आहेत.














