Vivo V70 Series: स्मार्टफोन जगतात आपल्या कॅमेरा क्वालिटीसाठी प्रसिद्ध असलेल्या विवोने भारतात आपली नवीन ‘व्ही ७०’ (V70) सीरीज अधिकृतपणे सादर केली. यामध्ये विवो व्ही ७० एलिट आणि विवो व्ही ७० या दोन शक्तिशाली मॉडेल्सचा समावेश आहे. प्रीमियम सेगमेंटमधील ग्राहकांसाठी खास ‘झाइस’ (ZEISS) ब्रँडिंगसह हे फोन लाँच करण्यात आले आहेत.
डिस्प्ले आणि परफॉर्मन्स
या दोन्ही फोनमध्ये ६.५९ इंचाचा १.५ के ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याचा पीक ब्राइटनेस ५,००० निट्स इतका असून १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटमुळे वापरकर्त्यांना एक स्मूथ अनुभव मिळेल.
- Vivo V70 Elite: यात स्नॅपड्रॅगन ८ एस जेन ३ प्रोसेसर असून १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजचा पर्याय मिळतो.
- Vivo V70: हा फोन स्नॅपड्रॅगन ७ जेन ४ प्रोसेसरवर चालतो, ज्यामध्ये १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज दिले आहे. हे दोन्ही फोन्स अँड्रॉइड १६ वर आधारित ओरिजिन ओएस ६ वर चालतात. कंपनीने ४ पिढ्यांचे ओएस अपडेट्स आणि ६ वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.
कॅमेरा आणि बॅटरी
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये झाइस ट्यून केलेला ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेन्स आणि ३ एक्स ऑप्टिकल झूमसह ५० मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फ्रंटला ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे. ५,१०० एमएएच ऐवजी आता या फोनमध्ये ६,५०० एमएएचची मोठी बॅटरी असून सोबतीला ९० व्हॅटचा फास्ट चार्जर मिळतो. हे फोन पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी आयपी ६८ आणि ६९ रेटिंगसह येतात.
किंमत आणि उपलब्धता
- Vivo V70 Elite: याची सुरुवातीची किंमत ८ जीबी/२५६ जीबी मॉडेलसाठी ५१,९९९ रुपये आहे. ५६,९९९ (१२/२५६) आणि ६१,९९९ (१२/५१२) असे इतर पर्यायही उपलब्ध आहेत.
- Vivo V70: हा फोन ४५,९९९ (८/२५६) आणि ४९,९९९ (१२/२५६) रुपयांच्या किमतीत मिळेल.
या स्मार्टफोनची विक्री २६ फेब्रुवारी २०२६ पासून विवोची अधिकृत वेबसाईट, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि सर्व प्रमुख रिटेल स्टोअर्सवर सुरू होईल.















