Ram Kadam : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील (Mumbai-Pune Expressway) अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) प्रकल्पाच्या बोगद्यात झालेली दरड कोसळी आणि गळतीची दुर्घटना सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील हिंदी भाषणावर आणि ‘बघून घेऊ’ या इशाऱ्यावर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत आक्षेप घेतला होता. राज ठाकरेंच्या याच तोफेला आता भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. “आमिर खानच्या लग्नाला गेल्यावर आपण स्वतः किती मराठी बोललात? मग मुख्यमंत्र्यांनी भाषणात दोन ओळी हिंदीत बोलल्या तर एवढा आक्षेप का?” असा थेट सवाल उपस्थित करत राम कदमांनी मनसे प्रमुखांना घरचा आहेर दिला आहे.
“मुख्यमंत्र्यांची ओळख ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून, विरोधकांना केवळ कामाची धास्ती”
राज ठाकरे यांच्या आरोपांचा समाचार घेताना आमदार राम कदम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी भक्कम उभे राहत त्यांच्या विकासकामांचे कौतुक केले. राम कदम म्हणाले की, “राज्यात मराठी भाषेचा आणि अस्मितेचा आदर नेहमीच सर्वोच्च स्थानी राहिला आहे आणि पुढेही राहील. मात्र, केवळ दोन ओळी हिंदीत बोलल्यामुळे कोणाचे मराठीपण कमी होत नाही. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची ओळख संपूर्ण देशात ‘इन्फ्रा मॅन’ (पायाभूत सुविधांचे निर्माते) अशी निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात धडाधड आणि गतीने मोठ्या विकासप्रकल्पांची कामे सुरू आहेत. याच अफाट विकासकामांची धास्ती आणि भीती आता विरोधकांना वाटू लागली आहे. त्यामुळेच वैफल्यातून विरोधकांकडून कंत्राटातील टक्केवारीच्या खोट्या गोष्टी करून सरकारला आणि या चांगल्या प्रकल्पांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.”
“मिसिंग लिंकवरची दरड हा केवळ एक अपघात”
विकासप्रकल्पातील तांत्रिक त्रुटींवर बोलताना राम कदम यांनी विरोधकांच्या नकारात्मक दृष्टिकोनावर बोट ठेवले. ते म्हणाले की, ‘मिसिंग लिंक’ सारख्या अतिभव्य प्रकल्पावर झालेली दरड कोसळी ही एक नैसर्गिक आपत्ती आणि निव्वळ ‘अपघात’ होती. दुर्देवाने, आजकालचे विरोधक आणि काही लोक सरकारच्या एवढ्या मोठ्या चांगल्या कामांबद्दल कधीही कौतुकाचे दोन शब्द बोलत नाहीत; मात्र निसर्गामुळे उद्भवलेल्या एखाद्या छोट्या त्रुटी किंवा अपघातावर अहोरात्र राजकारण करत बसतात. काँग्रेस पक्षाचा दाखला देत त्यांनी पुढे म्हटले की, ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर कायम प्रश्न उपस्थित करणे हा काँग्रेसचा ठरलेला अजेंडा होता, तसाच काहीसा नकारात्मक अजेंडा आता इतर विरोधक विकासकामांच्या बाबतीत राबवत आहेत.
राज ठाकरेंची नेमकी टीका काय होती?
या वादाची ठिणगी मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात राज ठाकरेंनी केलेल्या भाषणामुळे पडली होती. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर तोफ डागताना म्हटले होते की, “मिसिंग लिंक उत्तम दर्जाचे बांधकाम असल्याचे सांगताना मुख्यमंत्री टीका करणाऱ्यांना ‘बघून घेऊ’ अशी भाषा वापरतात, मुख्यमंत्री पदावरील व्यक्तीला हे शोभते का? आणि हे बोलताना ते अचानक मराठी सोडून हिंदीत बोलायला लागले. विधानसभा महाराष्ट्राची असताना आमचे मुख्यमंत्री हिंदीत कोणासाठी बोलत होते? ते कदाचित स्वतःच्याच पक्षातील दिल्लीतील नेत्यांना ‘बघून घेईन’ असा संदेश देत होते, कारण भाजपमधील अंतर्गत घमासान आता लपलेले नाही.”
यासोबतच फडणवीसांच्या ‘राजकारण करू नका’ या विधानाचा समाचार घेताना राज ठाकरे म्हणाले होते की, “प्रकल्पातील भ्रष्टाचारावर बोलले की मुख्यमंत्र्यांना ते राजकारण वाटते आणि त्यात महाराष्ट्राचा अपमान दिसतो. मग तुम्ही विरोधी पक्षात असताना केलेली आंदोलने राजकारण नव्हते का? आता स्वतःच्या अंगाशी आल्यावर विरोधक राजकारण करतात, असे तुम्ही बोलताय. केंद्र सरकारविरोधात काही बोलले तर देशविरोधी आणि प्रकल्पावर बोलले तर महाराष्ट्रद्रोही ठरवण्याची ही नवी पद्धत जनतेचे प्रश्न विचारण्याचे अधिकार हिरावून घेणारी आहे.”










