Bhigwan Case Update : पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील २१ वर्षीय तरुणीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले असून, या प्रकरणातील गुंता आता अधिकच वाढत चालला आहे. याप्रकरणी जहीर शेख आणि अयान शेख यांच्यावर अपहरणाचे गंभीर आरोप करण्यात आले होते. मात्र, मध्यरात्री तरुणी आणि संशयित आरोपी स्वतःहून बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाल्याने या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. बारामती सत्र न्यायालयात सादर करण्यात आलेल्या जबाबात तरुणीने आपल्या आईकडे जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. यावर मुलीच्या नातेवाईकांनी तीव्र आक्षेप नोंदवत, तरुणीवर मोठ्या प्रमाणावर दबाव टाकला जात असल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणात तक्रारदारांनी केलेल्या दाव्यांवर वैद्यकीय अहवालाने मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सुरुवातीच्या तक्रारीत, मुलीच्या आई आणि भावाच्या डोळ्यांत आरोपींनी मिरचीपूड फेकून अपहरण केल्याचा उल्लेख होता. मात्र, आई आणि भावाच्या वैद्यकीय तपासणीचा अधिकृत अहवाल प्राप्त झाला असून, त्यात डोळ्यांत मिरचीपूड टाकल्याचे कोणतेही पुरावे किंवा चिन्हे आढळलेली नाहीत. या विसंगतीमुळे मूळ तक्रारीच्या विश्वासार्हतेवर संभ्रम निर्माण झाला असून, पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
तरुणीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत खळबळजनक दावे केले आहेत. तिने म्हटले आहे की, आईने दाखल केलेली अपहरणाची तक्रार पूर्णपणे खोटी असून, तिला कोणतीही मारहाण झालेली नाही किंवा तिचे दागिनेही हिसकावण्यात आलेले नाहीत. गेल्या एक वर्षापासून संबंधित तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध असून ती स्वतःच्या मर्जीने त्याच्यासोबत गेल्याचे तिने नमूद केले. सध्या तरुणीची सुरक्षा लक्षात घेता तिला महिला वस्तीगृहात ठेवायचे की अन्य कोणाच्या ताब्यात द्यायचे, याचा निर्णय न्यायालय कायद्यानुसार घेणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार आई आणि मुलीची भेट घडवून आणण्यात आली आहे.
या प्रकरणाचे पडसाद राजकीय क्षेत्रातही उमटले आहेत. संशयित आरोपीचा नातेवाईक अझर शेख याने व्हॉट्सॲप स्टेटसवर भाजप आमदार राहुल कुल यांचा फोटो ठेवून ‘सदैव एकनिष्ठ’ असे लिहिल्याने वादाला तोंड फुटले. यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी न्यायालय परिसरात आमदार कुल यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मुलीच्या आईने आरोप केला आहे की, आमदार राहुल कुल हे आरोपींना पाठबळ देत आहेत. या आरोपांचे खंडन करताना राहुल कुल यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करत म्हटले की, “मलाही मुलगी आहे, माझ्या घरात अनेक महिला पदाधिकारी आहेत. माझ्यावर होणारे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत.”
आज पुण्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत तपासाची सद्यस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले की, तरुणीने पोलिसांकडे येण्यापूर्वी व्हिडिओमध्ये जे मत व्यक्त केले होते, त्यावरूनच तिने आपला जबाब नोंदवला आहे. तरीही, आई आणि मुलीच्या जबाबातील तफावत लक्षात घेऊन दोन्ही बाजूंच्या म्हणण्यांची सखोल चौकशी केली जात आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी सर्व तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांची तपासणी करत आहे.















