Sapperscout RP Ver 2.0 Indian Army UGV : भारतीय लष्कराच्या ‘आत्मनिर्भर’ मोहिमेला मोठे यश मिळाले असून, शत्रूच्या भागात मानवी हस्तक्षेपाशिवाय टेहळणी आणि इतर कामे करणारे पहिले स्वदेशी मानवरहित भू-वाहन ‘सॅपरस्काऊट आरपी व्हर्जन 2.0’ तयार करण्यात आले आहे. कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सचे मेजर राजप्रसाद आर.एस. यांनी हे विशेष रोबोटिक वाहन विकसित केले असून, पुण्यात आयोजित एका संरक्षण परिसंवादात याचे सादरीकरण करण्यात आले.
मेजर राजप्रसाद यांचे १२ वे संशोधन
मेजर राजप्रसाद हे लष्करातील एक उत्कृष्ट संशोधक म्हणून ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत 12 विविध उपकरणे विकसित केली असून, त्यापैकी 4 उपकरणे गेल्या 2 वर्षात भारतीय लष्कराच्या सेवेत दाखल झाली आहेत. यापूर्वी त्यांनी बनवलेले ‘विद्युत रक्षक’ आणि ‘अग्निस्त्र’ ही यंत्रणा लष्कराने यशस्वीपणे स्वीकारली आहे. आता ‘सॅपरस्काऊट’ हे त्यांचे सर्वात आधुनिक संशोधन ठरले आहे.
‘सॅपरस्काऊट’ची खास वैशिष्ट्ये
हे रोबोटिक वाहन कोणत्याही कठीण भूप्रदेशात चालण्यासाठी सक्षम आहे:
- सर्व प्रकारच्या जमिनीवर चालणारे: हे 6 चाकी वाहन असून वाळवंट तसेच उंच डोंगराळ भागात सहज हालचाल करू शकते.
- अनेक कामे एकाच वेळी: यामध्ये भूसुरुंग शोधणे, ओझे वाहून नेणे, शत्रूची टेहळणी करणे आणि जखमी सैनिकांना सुरक्षित बाहेर काढणे अशा विविध सुविधा आहेत.
- शस्त्र यंत्रणा: या वाहनावर आधुनिक शस्त्रास्त्रे आणि ड्रोन विरोधी यंत्रणा देखील बसवता येऊ शकते.
- सेन्सर्सची साथ: अडथळे ओळखण्यासाठी आणि पर्यावरणातील बदलांची नोंद घेण्यासाठी यात प्रगत सेन्सर्स बसवण्यात आले आहेत.
युद्धभूमीवर ‘फोर्स मल्टिप्लायर’ ठरणार
लष्कराच्या दक्षिण कमांडने पुण्यात आयोजित केलेल्या प्रदर्शनात या वाहनाचे कौतुक झाले. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी या स्वदेशी तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. हे वाहन भविष्यात सैनिकांच्या सोबतीने युद्धभूमीवर काम करेल, ज्यामुळे मानवी जीवितहानी कमी होण्यास मदत होईल. रसद पुरवठा, दारूगोळा पोहोचवणे आणि टेहळणी या कामात हे वाहन लष्कराची शक्ती अनेक पटीने वाढवेल.
लवकरच हे वाहन भारतीय लष्कराच्या प्रत्यक्ष सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. या यशामुळे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील ‘मेक इन इंडिया’ मोहिमेला मोठी चालना मिळाली आहे.











