Amol Mitkari On Ajit Pawar Plane Crash : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अकाली निधनाला आज एक महिना पूर्ण झाला आहे. २८ जानेवारी रोजी झालेल्या त्या भीषण विमान अपघाताने संपूर्ण राज्य हादरले होते. मात्र, महिना उलटूनही या दुर्घटनेमागील कारणांचा उलगडा न झाल्याने आमदार अमोल मिटकरी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “अजित पवारांचा तो मृत्यू केवळ अपघात होता की एखादा नियोजित घातपात?” या प्रश्नाचे उत्तर मिळेपर्यंत आपला लढा सुरूच राहील, असा निर्धार मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
तपासातील संथगती आणि राजकीय दबाव?
अमोल मिटकरी यांनी आपल्याच पक्षातील काही नेत्यांच्या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “जेव्हा मी या अपघाताच्या चौकशीची मागणी करतो, तेव्हा माझ्याच पक्षातील काही वरिष्ठ नेते मला टोकतात. ‘तुम्ही या विषयावर एवढे का बोलताय?’ असा प्रश्न मला विचारला जातो. त्यांच्या या भूमिकेमागचे गुपित मला ठाऊक नाही, परंतु माझ्या नेत्याच्या मृत्यूचे सत्य बाहेर येणे हा माझा अधिकार आहे.” मिटकरी यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असून, तपासाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रोहित पवारांशी हातमिळवणी आणि भावनिक साद-
राजकीय मतभेद बाजूला ठेवून, अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मिटकरी यांनी रोहित पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. “जर रोहित पवार या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी करत असतील, तर मी त्यांच्यासोबत आहे. कोणत्याही पक्षाचा आमदार जर सत्याच्या बाजूने उभा राहत असेल, तर आम्ही त्यांना सोबत घेऊ,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान अजित पवारांच्या खुर्चीकडे पाहून आजही डोळे पाणवतात, असे सांगताना मिटकरी भावूक झाले. “अजूनही वाटते की दादा सभागृहात येतील, आमच्याशी चर्चा करतील आणि देवगिरीवर बैठकीसाठी बोलावतील; पण वास्तव अत्यंत क्रूर आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
२८ जानेवारीचा तो काळरात्र ठरलेला प्रवास-
अजित पवार यांचा मृत्यू एका भीषण विमान अपघातात झाला होता. २८ जानेवारी रोजी सकाळी ते एका खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगच्या प्रक्रियेदरम्यान विमानाला अपघात झाला आणि त्यात अजित पवारांसह एकूण पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले. २९ जानेवारी रोजी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखो समर्थक आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. मात्र, लँडिंगदरम्यान नेमकी काय तांत्रिक चूक झाली किंवा काही बाह्य हस्तक्षेप होता का, याचा शोध अद्याप लागलेला नाही.










