Home / महाराष्ट्र / US, Israel attack on Iran : तिसरे महायुध्द सुरू ! ट्रम्पची दादागिरी! इस्त्रायलचा इराणवर हल्ला ! इराणचेही प्रत्युत्तर ! आखातातील 8 देशांतील अमेरिकी तळांवर हल्ले

US, Israel attack on Iran : तिसरे महायुध्द सुरू ! ट्रम्पची दादागिरी! इस्त्रायलचा इराणवर हल्ला ! इराणचेही प्रत्युत्तर ! आखातातील 8 देशांतील अमेरिकी तळांवर हल्ले

US, Israel attack on Iran : आज पहाटे इस्त्रायलने इराणवर जबरदस्त बॉम्ब हल्ले करून तिसरे महायुध्द सुरू केले. इराणचे...

By: Team Navakal
Social + WhatsApp CTA

 US, Israel attack on Iran : आज पहाटे इस्त्रायलने इराणवर जबरदस्त बॉम्ब हल्ले करून तिसरे महायुध्द सुरू केले. इराणचे खोमेनी सरकार पायउतार करून इराणची अणुशस्त्र पूर्ण नेस्तनाबूत केल्याशिवाय आता अमेरिका थांबणार नाही, अशी दादागिरीची भाषा करीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणला चेतावनी दिली की, अमेरिकेशी शत्रुत्व घेणे किती महागात पडते हे तुम्हाला आता कळेल. ट्रम्पने हा इशारा दिल्यानंतरही इराणने माघार घेतली नाही. उलट आखाती देशातील कतार, अबूधाबी, जॉर्डन, ओमान, बाहरीन, रियाध, कुवैत, वेस्ट बँक वर तुफानी हल्ले चढवले. या भागात जवळजवळ 80 लाख भारतीय वास्तव्यास आहेत. त्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.


गेले काही महिने अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत चाललेल्या तणावाचा आज उद्रेक झाला. आज सकाळी सर्वप्रथम इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्रांचा मारा करण्यास सुरुवात केली. इराणची राजधानी तेहरानसह इस्फहान, कराज, करमानशाह, क्योम आदि शहरांवर इस्रायलने असंख्य क्षेपणास्त्र हल्ले केले. काही वेळाने अमेरिका या हल्ल्यात सहभागी झाला. अमेरिकेने ऑपरेशन एपिक फ्युरी आणि इस्रायलने सिंहगर्जना या नावाने इराण विरोधात युद्ध छेडले. त्यानंतर इराणने अमेरिका आणि इस्रायलला क्षेपणास्त्रांचा मारा करत चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. इस्रायलसह अमेरिकेचे लष्करी, हवाई, नौदल तळ असलेल्या आखाती देशांवर इराणने हल्ले केले.
इराणवर हल्ला केल्यास इराण प्रत्युत्तर देणार हे गृहित धरून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी देशवासीयांना संबोधित करत युद्ध सुरू झाल्याची माहिती दिली. लोकांना सुरक्षित स्थळी आश्रय देण्याचे आवाहन केले.शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. देशभरात धोक्याचा इशारा देण्यासाठी सायरन वाजू लागले. इस्रायलकडे 70 हजार सैनिक असलेले अतिरिक्त सैन्यदल आहे. या अतिरिक्त सैन्य दलालाही राजधानी तेल अवीवमध्ये तैनात करण्यात आले.


इराणने आखाती देशांमध्ये जिथे जिथे अमेरिकेचे लष्करी तळ आहेत अशा कुवैत, बाहरीन, जॉर्डन, ओमान, कतार, वेस्ट बँक, अबूधाबी आदि देशांवर हल्ले केले. जॉर्डनमधील मुअफ्फक अल-सल्ती, कुवैतमधील अली अल सलेम, कतारमधील अल उदैद आणि युएईमधील अल धफ्रा या अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणने क्षेपणास्त्र हल्ले केले. बहरिनमधील फिफ्थ फ्लिट या अमेरिकन नौदलाच्या  मुख्यालयावरही इराणने हल्ला केला. या युद्धाच्या परिस्थितीमुळे  बहुतांश आखाती देशांनी आपापली हवाई क्षेत्रे बंद केली. इस्त्रायलच्या तेल अविव शहरातील बेन गुरियन विमानतळ बंद करण्यात आले. इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेने टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. सुमारे 500 टॉमहॉक क्षेपणास्त्रे अमेरिकेने युद्धात उतरवली. हे युद्ध सुरू होण्यापूर्वीच अमेरिकेने तयारी करीत इस्त्रायलच्या उत्तरेकडे यूएसएस जेराल्ड, यूएसएस लिंकन ही लढाऊ विमाने तैनात केली होती.


कोणत्याही परिस्थितीत इराणचा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम उद्ध्वस्त करणे, तेथील आयातुल्लाह खोमेनी यांची धर्माधिष्ठीत सत्ता उलथून लावणे आणि इराणमध्ये अमेरिकाधार्जिणे सरकार आणणे या प्रमुख उद्देशाने अमेरिकेने आज हे इराणविरुद्ध युद्ध छेडले. यासंदर्भात इराण आणि अमेरिका यांच्यादरम्यान चर्चेच्या तीन फेऱ्या झाल्या होत्या. मात्र इराण अणुशक्ती निर्मितीच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिला. त्यामुळे युद्ध अटळ आहे असे संकेत आधीच मिळाले होते. युद्ध सुरू होताच काही वेळाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला संबोधित केले. इराण हा दहशतवादी देश असून, या दहशतवादी देशाला कदापि अण्वस्त्र निर्मिती करू देणार नाही, इराणचे नौदल आम्ही नष्ट करू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला. इराणविरूद्ध आपण ऑपरेशन एपिक फ्युरी सुरू केल्याची घोषणाही ट्रम्प यांनी केली. इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहु यांनी अमेरिकेचे जाहीर आभार मानले.


ट्रम्प यांचा खरा चेहरा समोर आला
अमेरिका-इराण युद्ध सुरू झाल्यानंतर काही वेळातच रशियाच्या वतीने प्रतिक्रिया देण्यात आली. त्यातून ट्रम्प यांच्यावर जळजळीत टीका करण्यात आली. स्वतःला शांतिदूत म्हणवून घेणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा समोर आला आहे, असे रशियाने म्हटले. इराणवरील हल्ल्याचा रशियाने निषेध केला. मात्र या हल्ल्यात रशिया उघडपणे कोणतीही भूमिका घेण्याची शक्यता नाही. याचे कारण युक्रेन विरोधातील त्यांच्या युद्धात रशियालाच अमेरिकेची मदत लागणार आहे. हे युद्ध छेडल्यानंतर संयुक्त राष्ट्राने लगेच आपली प्रतिक्रिया दिली नाही. तर इराणने म्हटले की हे युद्ध छेडल्याचा अमेरिका व इस्त्रायलला पश्चाताप होईल. यामुळे हे युद्ध दिर्घकाळ चालेल हे निश्चित आहे.


भारतीय विद्यार्थ्यांची मदतीची याचना
युद्ध सुरू होताच इराण व इस्त्रायलने  आपले हवाई क्षेत्र बंद केले. अन्य देशांनीदेखील या दोन्ही राष्ट्रांकडे जाणारी विमाने रद्द केली. त्यामुळे येथे शिक्षण घेत असलेले लाखो विद्यार्थी व नोकरदार, व्यावसायिक सध्या तिथेच अडकून पडले आहेत. कसेही करून मायदेशी परतण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी भारत सरकारकडे ते मदतीची याचना करत आहेत. एका भारतीय विद्यार्थिनीचा एक व्हिडिओ आज समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये तेहरान शहरात तोंडाला मास्क लावलेली विद्यार्थिनी भारत सरकारकडे मदतीची याचना करताना दिसत आहे. अबूधाबीचे विमानतळ, दुबईचा प्रसिध्द मरिना बीच येथेही हल्ला झाला. या हल्ल्यात एक भारतीय ठार झाल्याचे सांगण्यात येते, पण त्याचा तपशील मिळालेला नाही.


अबू धाबीत मंदिर बंद
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या सूचनेनुसार आणि सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अबूधाबी येथील बीएपीएस स्वामीनारायण हिंदू मंदिर खबरदारीच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आले आहे. भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार हा निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनाने स्पष्ट केले की, परिस्थितीनुसार पुढील अपडेट्स दिल्या जातील आणि मंदिराचे कामकाज पुन्हा सुरू होण्याबाबत सूचना वेळोवेळी दिल्या जातील.


एअर इंडियाची उड्डाणे स्थगित
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे संपूर्ण आखाती प्रदेशात तणाव वाढला आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करण्यात आल्याने प्रादेशिक सुरक्षा अधिक गंभीर बनली असून, दोन्ही बाजूंनी क्षेपणास्त्र हल्ले होत आहेत. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन एअर इंडियाने आखाती देशांकडे जाणारी सर्व उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले. तसेच प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचनादेखील जारी करण्यात आल्या आहेत. कंपनीने सांगितले की, परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय वेळोवेळी जाहीर केला जाईल.

राहुल गांधींचे भारतीयांच्या
सुरक्षेसाठी सरकारला आवाहन

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारकडे आवाहन केले. त्यांनी म्हटले की,  अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील वेगाने वाढत असलेले शत्रुत्व अत्यंत चिंताजनक आहे. मध्य पूर्वेतील प्रत्येक भारतीय नागरिकाची सुरक्षा ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असावी. मी भारत सरकारकडे त्वरित आणि सक्रिय उपाययोजना करण्याचे आवाहन करतो.


ट्रम्प यांचा इशारा! शरण या!
इराणवर हल्ला सुरू केल्यानंतर देशाला संबोधित करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, इराणच्या दहशतवादी सरकारकडे कधीही अणुअस्त्र असू देणार नाही यावर मी ठाम आहे. आम्ही याआधी इराणवर हल्ले करून त्यांचे आण्विक तळ उद्ध्वस्त केले. पुन्हा अणुअस्त्र उत्पादनाचा प्रयत्न करू नका, असे आम्ही त्यांना बजावले, पण त्यांनी ऐकले नाही. इराणकडून अमेरिकन नागरिकांना धोका होऊ शकतो. इराणने सतत आपल्या विरोधात धोरण ठेवले. इराक, बेरूत, मध्य पूर्व येथील अमेरिकन तळांवर सतत हल्ले केले. आता आम्ही हे सहन करणार नाही. इराणच्या पाठिंब्याने हमासने इस्त्रायलवर हल्ले करून अनेकांना ठार केले. त्यात अमेरिकनही ठार झाले. आम्ही त्यांच्याशी करार करण्याचा प्रयत्न अनेकवेळा केला. पण त्यांनी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे उत्पादित करणे सुरू केले. त्यामुळे युरोपातील आपले तळ आणि शेवटी थेट आपल्या देशाला धोका निर्माण झाला. आता आपण त्यांच्यावर हल्ला सुरू केला आहे. अमेरिकेशी दोन हात करू नये हे त्यांना आता कळेल. या हल्ल्यात त्यांची आण्विक शक्ती पूर्ण नष्ट करणार आहे. यात अमेरिकन शहीद होतील, पण हे आपल्या राष्ट्रासाठी आहे. मी इराणला ताकीद देतो की, त्यांनी पूर्ण शरणागती पत्करावी. इराणच्या जनतेला मी आवाहन करतो की, घरी सुरक्षित राहा. इराणच्या सत्ताधाऱ्यांपासून मी तुम्हाला मुक्त करणार आहे.

Web Title:
For more updates: , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या