Ali Khamenei Death : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीने आतापर्यंतचे सर्वात भीषण वळण घेतले आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक व राजकीय नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, इराणमध्ये ४० दिवसांचा राष्ट्रीय शोक घोषित करण्यात आला आहे.
हल्ल्याचा थरार: कसा झाला खामेनींचा अंत?
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी अयातुल्ला अली खामेनी हे एका अत्यंत महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त असताना हा हल्ला करण्यात आला. सुरक्षा परिषदेचे सल्लागार अली शमखानी आणि ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) चे प्रमुख मोहम्मद पाकपूर यांच्यासोबत खामेनी चर्चा करत होते. गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, इस्रायल आणि अमेरिका गेल्या अनेक दिवसांपासून अली शमखानी यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होते. शनिवारी शमखानी हे खामेनी यांच्या भेटीला गेले असता, दोन्ही देशांनी अचूक लक्ष्य भेदत त्या ठिकाणी भीषण बॉम्बफेक केली. ८६ वर्षीय खामेनी या हल्ल्यातून वाचू शकले नाहीत.
कुटुंबीयांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू
या प्राणघातक हल्ल्यात केवळ अयातुल्ला अली खामेनीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये त्यांची कन्या, जावई आणि नात यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. इराणच्या अधिकृत ‘प्रेस टीव्ही’ने खामेनी यांच्या निधनाच्या वृत्ताला पुष्टी दिली असून, देशात शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर संपूर्ण इराणमध्ये लष्करी सतर्कता वाढवण्यात आली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक प्रतिक्रिया
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या घटनेची अधिकृत माहिती दिली. ट्रम्प यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली भूमिका मांडताना म्हटले की, “इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेल्या अयातुल्ला अली खामेनी यांचा लष्करी मोहिमेदरम्यान अंत झाला आहे. हा जागतिक शांततेच्या दृष्टीने मिळालेला एक मोठा न्याय आहे.” इतकेच नव्हे तर, जोपर्यंत मध्यपूर्वेत संपूर्णतः शांतता प्रस्थापित होत नाही, तोपर्यंत ही कारवाई अशीच सुरू राहील, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे.
प्रतिहल्ले आणि जागतिक चिंता
खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. सूडाच्या भावनेतून इराणने अनेक अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असून, क्षेपणास्त्रांचा मारा सुरूच आहे. १ मार्च २०२६ रोजी समोर आलेल्या या घटनेमुळे जागतिक राजकारणात मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेवर या युद्धाचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.










