Home / लेख / Smartphone Price Hike : फोन खरेदी करणे आता महागणार! स्मार्टफोनच्या किमतीत 14 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता; कारण काय?

Smartphone Price Hike : फोन खरेदी करणे आता महागणार! स्मार्टफोनच्या किमतीत 14 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता; कारण काय?

Smartphone Price Hike : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता...

By: Team Navakal
Smartphone Price Hike
Social + WhatsApp CTA

Smartphone Price Hike : तुम्ही जर नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या खिशाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. 2026 मध्ये मेमरी चिपच्या जागतिक तुटवड्यामुळे स्मार्टफोनच्या किंमतीत मोठी वाढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (IDC) ताज्या अहवालानुसार, यावर्षी स्मार्टफोनच्या किमती 14 टक्क्यांनी वाढू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय क्षेत्रातील वाढती मागणी असल्याचे सांगितले जात आहे.

एआय क्रांती आणि चिपचा तुटवडा

सध्या जगभरात एआय तंत्रज्ञानाचा वेगाने विस्तार होत आहे. मोठ्या कंपन्या डेटा सेंटर्स आणि एआय सिस्टिम उभारण्यासाठी प्रगत मेमरी चिप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. यामुळे स्मार्टफोन आणि लॅपटॉपमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘डी-रॅम’ (DRAM) आणि डेटा सेंटर्ससाठी लागणाऱ्या ‘एचबीएम’ (HBM) चिप्सची मागणी प्रचंड वाढली आहे.

आशियातील मोठ्या चिप उत्पादक कंपन्यांनी आपला मोर्चा एआय कंपन्यांकडे वळवल्यामुळे ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी चिप्सचा पुरवठा मर्यादित झाला आहे. परिणामी, 2026 च्या पहिल्या तिमाहीत या चिप्सच्या किमती मागील तिमाहीच्या तुलनेत दुप्पट झाल्या आहेत.

बजेट स्मार्टफोनवर संकटाचे सावट

या दरवाढीचा सर्वाधिक फटका कमी किमतीचे फोन बनवणाऱ्या कंपन्यांना बसण्याची शक्यता आहे. विशेषतः चीनमधील बजेट स्मार्टफोन ब्रँड्सना आता 100 डॉलर्सपेक्षा (सुमारे 8,500 रुपये) कमी किमतीत फोन तयार करणे कठीण होणार आहे.

दुसरीकडे, ॲपल आणि सॅमसंग सारख्या मोठ्या कंपन्यांकडे मजबूत पुरवठा साखळी आणि दीर्घकालीन करार असल्यामुळे त्यांना याचा कमी फटका बसेल. मात्र, सॅमसंगने आधीच त्यांच्या काही मॉडेल्सच्या किमती वाढवल्या आहेत. नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी एस26 सीरिजच्या किमतीत 6,000 ते 10,000 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

उद्योगावर होणारा दीर्घकालीन परिणाम

एकेकाळी मेमरी चिप्स हा व्यवसाय कमी नफा देणारा मानला जात होता, परंतु एआयच्या आगमनाने हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. आता मेमरी चिप हा स्मार्टफोनमधील सर्वात महत्त्वाचा आणि महागडा घटक बनला आहे. तज्ज्ञांच्या मते, हा तुटवडा पुढील वर्षापर्यंत कायम राहू शकतो. यामुळे स्मार्टफोन कंपन्या आगामी काळात एन्ट्री-लेव्हल फोन्सची मेमरी क्षमता कमी करू शकतात किंवा केवळ प्रीमियम उत्पादनांवर लक्ष केंद्रित करू शकतात. ग्राहकांसाठी याचा अर्थ असा की, येत्या काही महिन्यांत स्वस्त फोनचे पर्याय कमी होतील आणि सर्वच श्रेणीतील स्मार्टफोन महाग होतील.

Web Title:
Topics:
संबंधित बातम्या