Crude Oil Price Hike: अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्यांनंतर पश्चिम आशियातील तणाव आता सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. याचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतींवर होताना दिसत आहे. इराणने आता उघडपणे इशारा दिला आहे की, जर त्यांच्या मुख्य केंद्रांवर पुन्हा हल्ला झाला, तर ते संपूर्ण पश्चिम आशियातील सर्व आर्थिक केंद्रांना लक्ष्य करतील.
इराणचा इशारा आणि 200 डॉलर्सचा टप्पा
इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डचे जनरल इब्राहिम जब्बारी यांनी स्पष्ट केले आहे की, जर शत्रूने इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ला केला, तर या क्षेत्रातील सर्व आर्थिक केंद्रे सुरक्षित राहणार नाहीत. त्यांनी असा दावाही केला आहे की, इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली आहे. सध्या कच्च्या तेलाची किंमत 80 डॉलर्सच्या वर आहे, परंतु इराणच्या मते ही किंमत लवकरच 200 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचू शकते. भारतीय चलनात ही किंमत सुमारे 18,398 रुपये प्रति बॅरल (159 लिटर) इतकी होते.
जुलै 2024 नंतर पहिल्यांदाच दरात मोठी वाढ
तणाव वाढताच ब्रेंट क्रूडने 85 डॉलर्स प्रति बॅरलचा टप्पा ओलांडला आहे. जुलै 2024 नंतर पहिल्यांदाच कच्च्या तेलाने या पातळीला स्पर्श केला आहे. होर्मुझची सामुद्रधुनी हा जगासाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, जागतिक तेल व्यापाराचा सुमारे 20 टक्के हिस्सा, म्हणजेच दररोज साधारण 2 कोटी बॅरल तेल याच मार्गावरून जाते. कतार आणि युएई सारख्या देशांचा एलएनजी पुरवठा देखील याच मार्गावर अवलंबून आहे.
भारतावर काय परिणाम होणार?
भारत आपल्या गरजेच्या 80 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 200 डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या, तर भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर 200 रुपये प्रति लिटरच्या जवळ किंवा त्याही वर जाऊ शकतात. तज्ज्ञांच्या मते, क्रूड ऑईल 200 डॉलर्सवर गेल्यास दिल्लीत पेट्रोलची किंमत सुमारे 177 रुपये आणि डिझेल 168 रुपयांपर्यंत पोहोचू शकते.
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याचा अर्थ केवळ इंधन महागणे असा होत नाही. यामुळे वाहतूक खर्च वाढून भाजीपाला, दूध आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतींवर थेट परिणाम होईल. सध्या जगाचे लक्ष होर्मुझ आणि अमेरिका-इराण-इस्रायल यांच्यातील संघर्षावर खिळले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार पडणे निश्चित आहे.











