Home / महाराष्ट्र / BMC Ward Committees Election : राज ठाकरे नाराज? उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मनसेची मुंबई महापालिकेत मोठी चाल?

BMC Ward Committees Election : राज ठाकरे नाराज? उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मनसेची मुंबई महापालिकेत मोठी चाल?

BMC Ward Committees Election : मुंबई महानगरपालिकेतील १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आजपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र...

By: Team Navakal
BMC Ward Committees Election
Social + WhatsApp CTA

BMC Ward Committees Election : मुंबई महानगरपालिकेतील १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आजपासून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होत आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) ‘तटस्थ’ राहण्याचा निर्णय घेतल्याची विश्वासार्ह माहिती समोर येत आहे. मनसेच्या या पवित्र्यामुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता असून, याचा थेट फायदा महायुतीला मिळण्याची चिन्हे आहेत.

नाराजीचे नेमके कारण काय?
राजकीय वर्तुळातील चर्चेनुसार, शिवसेना (UBT) गटाकडे असलेल्या ३ स्वीकृत नगरसेवक पदांपैकी एक जागा मनसेला मिळावी, अशी राज ठाकरे यांच्या पक्षाची अपेक्षा होती. स्वीकृत नगरसेवक पद न दिल्यास, त्याबदल्यात काही प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मनसेला देण्याबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाली होती. मात्र, ही आश्वासने पूर्ण न झाल्याने मनसे नेतृत्व नाराज असल्याचे समजते. परिणामी, ऐन निवडणुकीच्या तोंडावर तटस्थ राहून ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी करण्याची रणनीती मनसेने आखली आहे.

प्रभाग समित्यांचे संभाव्य सत्तासमीकरण-
मनसेच्या तटस्थ भूमिकेमुळे अनेक प्रभागांमधील गणिते बदलणार आहेत. विविध प्रभाग समित्यांमधील सद्यस्थिती खालीलप्रमाणे असू शकते-
१. महाविकास आघाडीचे वर्चस्व: ए, बी, इ, जी दक्षिण, जी उत्तर, एच पूर्व, एच पश्चिम, के उत्तर, पी पूर्व, पी पश्चिम आणि एल प्रभाग.
२. महायुतीचे वर्चस्व: सी, डी, के दक्षिण, के पश्चिम, पी दक्षिण, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एम पश्चिम आणि एन प्रभाग.

पेच निर्माण होणारे प्रभाग-
१. एफ दक्षिण व एफ उत्तर: येथे मनसे तटस्थ राहिली तर महाविकास आघाडी आणि महायुतीचे संख्याबळ समसमान होऊ शकते.
२. एस व टी प्रभाग: येथेही सदस्यसंख्या समसमान असल्याने मनसेची अनुपस्थिती महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर करू शकते.
३. एम पूर्व: येथे एमआयएमची भूमिका निर्णायक ठरेल.

निवडणूक कार्यक्रम आणि महत्त्व-
मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज, ५ मार्च रोजी अर्ज सादर केले जातील. पुढील तीन दिवसांत टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया पार पडणार आहे-
५ मार्च (गुरुवार): सी, डी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर, आर उत्तर, आर मध्य, आर दक्षिण आणि पी दक्षिण.
६ मार्च (शुक्रवार): जी उत्तर, जी दक्षिण, पी उत्तर, के पूर्व आणि के पश्चिम.
९ मार्च (सोमवार): एल, एम पश्चिम, एम पूर्व, एन, एस आणि टी.

राजकीय प्रतिष्ठेची लढाई-
महापौर आणि उपमहापौर निवडीनंतरची ही पहिलीच मोठी राजकीय चाचणी मानली जात आहे. प्रभाग समित्यांकडे स्थानिक पातळीवरील रस्ते, पाणी, मलनिस्सारण आणि विकासकामांचे अधिकार असल्याने या पदांना विशेष महत्त्व आहे. महायुतीने १७ पैकी ९ समित्यांवर दावा केला असला, तरी उर्वरित प्रभागांमध्ये शिवसेना (UBT), काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरस पाहायला मिळेल. मनसेच्या भूमिकेमुळे काही ठिकाणी बिनविरोध निवडीची शक्यता असली, तरी बहुतांश ठिकाणी ‘क्रॉस व्होटिंग’ची भीती राजकीय पक्षांना सतावत आहे.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या