Iranian Actress Mandana Karimi Leaving India : एकीकडे इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे आखाती देशांतील परिस्थिती चिंताजनक बनली असताना, दुसरीकडे भारतात कार्यरत असलेल्या एका इराणी अभिनेत्रीच्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील ओळखीचा चेहरा असलेली अभिनेत्री मंदाना करिमी हिने भारत सोडण्याचा आणि आपल्या मायदेशी म्हणजेच इराणला परतण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आता आपल्याला सुरक्षित वाटत नसल्याची खळबळजनक भावना तिने व्यक्त केली आहे.
भारतात राहणे असुरक्षित वाटत असल्याची खंत-
मूळची इराणची असलेल्या मंदाना करिमीने एका मुलाखतीदरम्यान हा खुलासा केला. गेल्या अनेक वर्षांपासून ती भारतात राहून आपले मॉडेलिंग आणि अभिनयाचे करिअर घडवत आहे. मात्र, अलीकडच्या काळात तिच्या राजकीय सक्रियतेमुळे आणि इराणमधील परिस्थितीवर उघडपणे भाष्य केल्यामुळे तिला भारतात एकटेपणा आणि असुरक्षितता जाणवू लागली आहे. “देशाबाहेर गेल्याशिवाय मी अधिक सविस्तर माहिती देऊ शकत नाही, पण सुरक्षेच्या कारणास्तव मी हा निर्णय घेत आहे,” असे तिने स्पष्ट केले.
राजकीय भूमिका आणि मृत्यूच्या धमक्या-
मंदाना करिमी इराणमधील हुकूमशाही आणि मानवी हक्कांच्या प्रश्नावर नेहमीच आवाज उठवत आली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या धोरणांवर तिने सातत्याने टीका केली असून तेथील जनतेच्या समर्थनासाठी ती उभी राहिली आहे. या सक्रियतेमुळे तिला सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा धक्कादायक खुलासाही तिने केला. “मला नेहमीच धमक्या मिळत राहिल्या, पण या कठीण काळात मला मित्र, सरकार किंवा माध्यमांकडून अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. त्यामुळे आता भारत मला माझे घर वाटत नाही,” अशी व्यथा तिने मांडली.
इराणमधील बदलासाठी ती सज्ज-
मंदाना हिने सांगितले की, इराणमध्ये नवे सरकार स्थापन होताच ती तिथे परतणार आहे. इराणमधील ‘जाविद शाह’ आणि ‘रझा पहलवी’ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली चळवळ आता अधिक संघटित आणि मजबूत झाली असल्याचे तिचे मत आहे. तिने स्पष्ट केले की, जरी ती भारत सोडत असली तरी इराणच्या जनतेसाठी आणि तिथल्या हक्कांच्या लढाईसाठी ती आपले प्रयत्न कधीही थांबवणार नाही.
करिअरचा त्याग करून मायभूमीकडे ओढ-
मंदाना करिमीने भारतात राहून ‘बिग बॉस’ सारख्या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये आणि विविध चित्रपटांत काम केले आहे. यशस्वी करिअर असतानाही, आपल्या देशातील जनतेसाठी पुन्हा एकदा संघर्ष सहन करण्याची तिची तयारी आहे. इराणमध्ये बदलाचे वारे वाहत असून हा काळ केवळ दबावाचा नसून एका मोठ्या तयारीचा आहे, असा विश्वासही तिने यावेळी व्यक्त केला.










