Home / देश-विदेश / US Iran Conflict : हिंदी महासागरात युद्धाचा भडका! अमेरिकने इराणची युद्धनौका उडवली; व्हिडिओ आला समोर

US Iran Conflict : हिंदी महासागरात युद्धाचा भडका! अमेरिकने इराणची युद्धनौका उडवली; व्हिडिओ आला समोर

US submarine attacks Iranian warship IRIS Dena : हिंदी महासागरात श्रीलंका किनारपट्टीजवळ अमेरिकन नौदलाने इराणच्या एका युद्धनौकेवर भीषण हल्ला केल्याची...

By: Team Navakal
US submarine attacks Iranian warship IRIS Dena
Social + WhatsApp CTA

US submarine attacks Iranian warship IRIS Dena : हिंदी महासागरात श्रीलंका किनारपट्टीजवळ अमेरिकन नौदलाने इराणच्या एका युद्धनौकेवर भीषण हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अमेरिकेच्या एका लष्करी पाणबुडीने इराणच्या युद्धनौकेवर टॉर्पेडो डागून ती उद्ध्वस्त केली.

या हल्ल्यात इराणच्या 87 नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात हा हल्ला केल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

हल्ल्याचा थरार कॅमेऱ्यात कैद

अमेरिकेच्या संरक्षण विभागाने या हल्ल्याचा एक ड्रोन व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. व्हिडिओमध्ये इराणची ‘आयआरआयएस डेना’ (IRIS Dena) ही युद्धनौका संथ गतीने प्रवास करताना दिसते. अचानक जहाजाच्या मागील भागाजवळ एक प्रचंड मोठा स्फोट होतो आणि आगीच्या ज्वाळांसह पाण्याचे लोट हवेत उसळतात.

स्फोट इतका भीषण होता की जहाजाचा मागील भाग पूर्णपणे छिन्नविच्छिन्न झाला. काही क्षणांतच जहाजातून काळा धूर निघू लागला आणि ते एका बाजूला कलून समुद्रात बुडू लागले.

श्रीलंकेचे बचावकार्य आणि मदत

युद्धनौकेकडून धोक्याचा इशारा (Distress Call) मिळाल्यानंतर श्रीलंकेने तातडीने शोध आणि बचाव मोहीम हाती घेतली. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री विजिता हेरथ यांनी सांगितले की, जहाज बुडाले तेव्हा त्यावर सुमारे 180 लोक होते.

श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत 32 जणांना सुखरूप वाचवले असून त्यांना उपचारासाठी गाले येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नौदलाचे प्रवक्ते कमांडर बुद्धिका संपत यांनी माहिती दिली की, बचाव पथके घटनास्थळी पोहोचली तेव्हा तिथे फक्त तेलाचा तवंग तरंगताना दिसत होता.

भारतातील युद्धअभ्यासात घेतला होता सहभाग

विशेष म्हणजे, ही इराणी युद्धनौका 18 ते 25 फेब्रुवारी दरम्यान बंगालच्या उपसागरात भारताने आयोजित केलेल्या ‘मिलन’ या बहुराष्ट्रीय नौदल युद्धअभ्यासात सहभागी झाली होती. हा सराव संपवून परतत असतानाच श्रीलंकेच्या किनाऱ्यापासून साधारण 40 नॉटिकल मैल अंतरावर अमेरिकेने ही कारवाई केली. या घटनेमुळे आखाती देशांमधील तणाव आता हिंदी महासागरापर्यंत पोहोचल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title:
For more updates: , , , , stay tuned with Navakal
संबंधित बातम्या