Women Safety Maharashtra: राज्यातील बेपत्ता महिला आणि मुलांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता कंबर कसली आहे. विधानपरिषदेत आमदार निरंजन डावखरे आणि भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी माहिती दिली.
राज्यात बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी एक ‘स्पेशल सेल’ स्थापन करण्यात आला असून, यामुळे महिला सापडण्याच्या प्रमाणात गेल्या वर्षभरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष कक्ष
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या विशेष कक्षाचे नेतृत्व ‘अतिरिक्त पोलीस महासंचालक’ (ADG) दर्जाच्या महिला अधिकारी करत आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये समन्वय साधून हा कक्ष नियमित आढावा बैठका घेतो. वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली राज्यभर शोध मोहिमा राबवल्या जातात.
पहिल्या वर्षभरात साधारण 55 ते 60 टक्के बेपत्ता महिलांचा शोध लागतो, तर 2 ते 3 वर्षांच्या कालावधीत हे प्रमाण 90 टक्क्यांपर्यंत पोहोचते. सरकारचे उद्दिष्ट हे प्रमाण 95 ते 96 टक्क्यांपर्यंत नेण्याचे असून त्या दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत.
‘ऑपरेशन मुस्कान’ आणि ‘ऑपरेशन शोध’चा धमाका
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी अधिक माहिती देताना सांगितले की, जुलै 2015 ते डिसेंबर 2024 या काळात ‘ऑपरेशन मुस्कान’च्या 13 फेऱ्या राबवण्यात आल्या, ज्यामध्ये 41,193 बेपत्ता मुलांची सुटका करण्यात आली. सध्या सुरू असलेल्या ‘ऑपरेशन मुस्कान 14’ अंतर्गत (20 जानेवारी ते 20 फेब्रुवारी 2026) आतापर्यंत 1,401 मुलांचा शोध लागला आहे, ज्यात 454 मुले आणि 947 मुलींचा समावेश आहे. विशेषतः महिला आणि मुलांसाठी ‘ऑपरेशन शोध’ ही मोहीम देखील राबवली जात आहे.
महिला सुरक्षेसाठी कडेकोट उपाययोजना
महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात अनेक नवीन उपक्रम सुरू करण्यात आले आहेत:
- निर्भया पथक: महिलांच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवण्यासाठी निर्भया पथके तैनात करण्यात आली आहेत.
- पोलीस काका आणि पोलीस दिदी: शाळा-महाविद्यालयातील मुला-मुलींच्या मदतीसाठी हे उपक्रम राबवले जात आहेत.
- महिला मदत कक्ष: महाराष्ट्रातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी स्वतंत्र महिला मदत कक्ष (Help Desk) स्थापन करण्यात आले आहेत.
राज्यातील प्रत्येक महिला आणि मूल सुरक्षित राहावे आणि बेपत्ता व्यक्तींचा लवकरात लवकर शोध लागावा, यासाठी शासन यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येत असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.
हे देखील वाचा – US Iran Conflict : हिंदी महासागरात युद्धाचा भडका! अमेरिकने इराणची युद्धनौका उडवली; व्हिडिओ आला समोर











